घरांमध्येही शिरले पाणी : तहसीलदारांनी केली पाहणी चांदूरबाजार : तालुक्यात रात्री १.३० वाजता पासून सुरु असलेल्या संततधार पावसाने तालुक्यातील नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. घाटलाडकी, शिरजगाव कसबा येथील नाले ओव्हरफ्लो झाल्याने अनेक गावांच्या वाहतुकीला फटका बसला आहे. वारोळी या गावात बांधण्यात आलेला बंधारा या पाण्याने वाहून गेला तसेच बेलमंडळी येथील अनेक घरात पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.तालुक्यात ३१ जुलै रोजी सरासरी १२.८१ मिमी पाऊस झाला. यामध्ये ब्राह्मणवाडा थडी मंडळामध्ये सर्वाधिक २७ मिमी पाऊस झाला आहे. यामुळे घाटलाडकी, बेलमंडळी, शिरजगाव कसबा ही गावे सर्वाधिक प्रभावित झाली होती. तालुक्यात रात्री १.३० च्या सुमारे पावसाला सुरुवात झाली. त्यात वारोळी येथे बांधण्यात आलेल्या सीएनबी बंधारा पावसामुळे वाहून गेला तर याच भागातील शेती पाण्यामुळे पूर्णत: खरडून गेली. याच भागातील शेतकऱ्याचा बैल पावसात वाहून गेल्याची माहिती तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दिली. यासोबत बेलमंडळी येथील नाल्याकाठच्या १० ते १२ घरांत पुराचे पाणी शिरल्याने हे कुटूंब उघड्यावर आले आहेत. वारोळी येथील परिस्थितीची पाहणी करण्यास तहसीलदार शिल्पा बोबडे गेल्या असता पुलावरुन पाणी वाहत असल्याने पाहणी करता आली नाही. शिरजगाव कसबा येथील पुलावरून मोठया प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे कार्तिकस्वामी मंदिर ते शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन परिसरात पाणी साचले होते. शिरजगाव कसबा येथील बाजार पेठेतील ओटे सुध्दा पुराच्या पाण्यात बुडाले होते. पर्जन्यतापक यंत्रातील आकडेवारी बघता मंडळनिहाय अतिवृष्टी झाली नसल्याचे दिसून येत असले तरीही मंडळाच्या केंद्रापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मोठया प्रमाणात शेतीची हानी झाली आहे. परंतु महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार ही अतिवृष्टी नसल्यामुळे या नुकसानग्रस्त गावांना अतिवृष्टीची मदत मिळेल की नाही, यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. गावाशी संपर्क न होवू शकल्यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेता आला नाही. (तालुका प्रतिनिधी)
वारोळी बंधारा फुटला, शेकडो हेक्टर शेतीची हानी
By admin | Updated: August 2, 2016 00:08 IST