सुरेश सवळे चांदूरबाजारआपल्या अपंगत्वावर मात करुन एक अपंग दाम्पत्य शासनाच्या विविध योजना व उपक्रमाच्या प्रसारासाठी एक दोन नव्हे, चक्क ४८ गावांत गायनातून जागृती जनजागृतीचा प्रयत्न करीत आहे. अशा दाम्पत्याच्या मानधनाचे प्रकरण सात वर्षांपासून शासनदरबारी रखडून पडले आहे. ही व्यथा ‘लोकमत’कडे मांडली. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील टाकरखेडा (मोरे) येथील पूर्ण अंगाने पंगू असलेल्या गौतम भगवान गोले या ४९ वर्षीय गृहस्थाने ‘पूर्णामाय’ अपंग पुनर्वसन केंद्रात आयोजित ‘अपंग सेवा महायज्ञात अठरा विश्वे दारिद्र्याच्या छताखाली संसार व्यथित केला. हे दाम्पत्य त्यांची दोन निरागस बालकांसह टाकरखेडा (मोरे) येथे वास्तव्यास आहेत. गौतम भगवान गोले हे दोन्ही पायांनी पंगू आहेत, तर त्यांची मानही निकामी झाली आहे. त्यामुळे सहाऱ्याशिवाय ते कुठेही ये-जा करु शकत नाहीत. त्यांची पत्नी रुखमा ही ३५ वर्षीय गृहिणी दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. या दाम्पत्यांना आशिर्वाद (६) व आदर्श (८) नामक मुले आहेत. ते इयत्ता पहिली व तिसरीत शिकतात.हे दाम्पत्य अंध व अपंग असले तरी त्यांना निसर्गाने गायनाची कला बहाल केली आहे. आपल्या मधुर आवाजात गावोगावी व विविध कार्यक्रमात गायन सादर करुन आपली उपजिविका भागवितात. याशिवाय त्यांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ म्हणून ६०० रुपये मासिक अनुदान प्राप्त होते. त्यांना आ. बच्चू कडू यांच्या माध्यमातून सहकार्य मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांनी ४८ गावांत व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान या शासनाच्या विविध योजनांच्या प्रसारासाठी जनजागृती केली. त्यांना शासनातर्फे महिन्याकाठी कलावंतांना मिळणारे एक हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले. मात्र त्यांच्या पत्नीला कलावंताचे अनुदान अद्यापही मंजूर करण्यात आले नाही. २१ जुलै २००७ च्या पत्रासंदर्भात अंजनगाव पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे रुखमा गोले व फिकउल्लाखा यांचा मानधनाचा प्रस्ताव सादर कला होता. मात्र सात वर्षांनंतरही रुखमाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. याबद्दल गौतम यांनी खंत व्यक्त केली.
‘त्या’ अपंग दाम्पत्याने केली ४८ गावांत जनजागृती
By admin | Updated: February 13, 2015 00:50 IST