अमरावती : जागा वापरात बदल केल्याप्रकरणी पालकमंत्र्यांच्या कार्यालयाला दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून ही कर आकारणी दंडाची नोटीस असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी शहरातील दिग्गजांची प्रतिष्ठाने, निवासस्थानांच्या बांधकामांची तपासणी करण्याचे ठरविले होते. त्याअनुषंगाने तांत्रिकी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची निवड केली आहे. हे विद्यार्थी कर्मचाऱ्यांच्या सोबतीने मालमत्तांचे मोजमाप करुन ते योग्य की अयोग्य, हे तपासून तसा अहवाल सहायक आयुक्तांकडे दररोज सादर करतात. हा प्रकार गेल्या महिनाभरापासून सुरु आहे. त्यानुसार कॅम्प मार्गावरील पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या कार्यालयाच्या बांधकामाची तपासणी केली असता हे कार्यालय निवासी वापराच्या जागेवर बांधल्याचा अहवाल सादर केला होता. परिणामी झोन क्र. १ मालमत्ता कर वसुली विभागाने पालकमंत्री पोटे यांच्या कार्यालयाला १ लाख ३९ हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावल्याची माहिती आहे. याविषयी एका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत मौन बाळगले, हे विशेष. पालकमंत्री कार्यालयाला बजावलेल्या दंडात्मक नोटीसबाबत कमालीची गुप्तता बाळगली आहे.
पालकमंत्री कार्यालयाला बजावली नोटीस
By admin | Updated: July 28, 2015 00:21 IST