पश्चिम विदर्भात २२ तालुक्यातील भूजलात तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:09 AM2021-07-04T04:09:42+5:302021-07-04T04:09:42+5:30

गजानन मोहोड अमरावती : पश्चिम विदर्भात यंदा पावसाने ओढ दिली असली तरीही जून महिन्यात ३४ तालुक्यातील भूजलात सरासरीच्या तुलनेत ...

Groundwater deficit in 22 talukas in West Vidarbha | पश्चिम विदर्भात २२ तालुक्यातील भूजलात तूट

पश्चिम विदर्भात २२ तालुक्यातील भूजलात तूट

Next

गजानन मोहोड

अमरावती : पश्चिम विदर्भात यंदा पावसाने ओढ दिली असली तरीही जून महिन्यात ३४ तालुक्यातील भूजलात सरासरीच्या तुलनेत वाढ झाल्याचे सुखद चित्र आहे. शिवाय २२ तालुक्यातील भूजलात अंशत: घट झालेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने अमरावती विभागातील ६५१ विहिरींच्या नोंदीनंतर हे निरीक्षण नोंदविले आहे.

विभागात गतवर्षी सरासरी ७६१.८ मिमी सरासरीच्या तुलनेत ७८६ मिमी पावसाची नोंद झाली, याची १०३ टक्केवारी आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यात ६७ दिवस पावसाचे राहिले. बुलडाणा व वाशिम वगळता अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यात सरासरीच्या आतच पाऊस झाला. मात्र, सप्टेंबरपश्चात परतीचा पाऊस व नंतर सातत्याने डिसेंबरपर्यंत अवकाळीचा पाऊस झाल्याने विभागात भूजल पुनर्भरण बऱ्यापैकी झाले व त्याचाच आता परिणाम दिसत आहे.

काही तालुक्यात जलसंधारणाची कामे झाल्याने भूजलाचे पुनर्भरण झाले. याशिवाय जमिनीत मोठ्या प्रमाणात असलेली आर्द्रता व प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध झाल्याने भूजलाच्या वारेमाप उपशात कमी आली. परिणामी काही प्रमाणावर सरासरीच्या तुलनेत भूजलात वाढ झाली आहे. विभागातील ५६ पैकी १९ तालुक्यात फक्त १ मीटरपर्यंत तूट आली, तर दोन तालुक्यात १ ते २ मीटरपर्यंत घट झाली. फक्त अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात दोन मीटरपेक्षा जास्त तूट आलेली आहे.

बॉक्स

या तालुक्यातील भूजलात तूट

अमरावती जिल्ह्यात तिवसा, चांदूरबाजार, दर्यापूर, अंजनगाव अकोला जिल्ह्यात अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा, मोताळा, जळगाव जामोद, संग्रामपूर तर यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, कळंब, महागाव, केळापूर, राळेगाव, वणी, मारेगाव व झरी जामणी तालुक्यातील भूजलात तूट आलेली आहे.

बॉक्स

भूजलात वाढ झालेली तालुके

अमरावती जिल्ह्यात अमरावती, भातकुली, नांदगाव, चांदूर रेल्वे, मोर्शी, वरुड, अचलपूर, चिखलदरा, धारणी व धामणगाव, अकोला जिल्ह्यात बार्शी टाकळी वाशिम जिल्ह्यात वाशिम, मालेगाव, रिसोड, मंगरुळ पीर, मानोरा, कारंजा बुलडाणा जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, मलकापूर खामगाव, शेगाव यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव, आर्णी, दारव्हा, दिग्रस, नेरपुसद, उमरखेड व घाटंजी तालुक्यातील भूजलात वाढ झालेली आहे.

Web Title: Groundwater deficit in 22 talukas in West Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.