(फोटो/मेल)
अमरावती : निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी विविध उपक्रम महापालिकेतर्फे राबविण्यात येत आहे. याअंतर्गत महापालिकेच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातील युवकांना आयुक्त प्रशांत रोडे यांच्या उपस्थितीत हरीत शपथेचे गुरुवारी सामूहिक वाचन करण्यात आले.
महापालिका क्षेत्रातील नागरिकांना सोबत घेऊन अमरावतीत निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपध्दती अवलंबण्यासाठी ‘माझी वसुंधरा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. पृथ्वी पंचतत्त्वांनुसार शहरातील सामाजिक वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन आणि जमिनीचे धुपीकरण ही कामे केली जाणार आहेत. नवीन हरितक्षेत्र विकास योजनेचे नियोजन करण्यात येत आहे. अटल वन आनंदवन योजनेंतर्गत करण्यात येत असलेल्या कामात गती आणून पुर्णत्वास आणण्यात येत आहे. वायू पंचतत्त्वानुसार हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदुषण कमी केले जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहायक आयुक्त तथा नोडल अधिकारी नरेंद्र वानखडे यांनी केले. यावेळी पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, उद्यान अधीक्षक मुकुंद राऊत, अमोल साकुरे, स्पर्धा परीक्षा केंद्राचे सर्व विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.