अमरावती : जिल्ह्यातील ५५३ पैकी १२ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्यामुळे आता ५४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. सोमवार ४ जानेवारी रोजी अर्ज माघार घेतल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट झाले. काही अपवाद वगळता अनेक ठिकाणी दुरंगी लढत होत आहे. प्रचारासाठी आता अवघे ८ दिवस राहिले असल्याने प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे.
गेल्या काही वर्षापासून ग्रामपंचायतींना शासनाकडून थेट निधी उपलब्ध होत असल्याने या निवडणुकीत इच्छुकांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका लागल्या होत्या . यात १२ ग्रामपंचायती मधील ४३४ सदस्य अविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता ५४१ ग्रामपंचायतीमध्ये ४ हजार ४५२ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. याकरिता १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या निमित्ताने आता ग्रामपंचायतींत उमेदवारांनी प्रचारावर भर दिला आहे. अनेक गावांत दुरंगी, तिरंगी लढतीची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या सर्व ग्रामपंचायत निवडणुका १४ ही तालुक्यात होत असल्याने तालुक्यासोबत जिल्हास्तरीय नेत्यांचीही या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. एकंदरित ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. अनेक उमेदवारांनी आता आपला मोर्चा प्रचाराकडे वळविला आहे. हा प्रचार १३ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बॉक्स
मतदारांचा कौल मिळविण्याचा प्रयत्न
ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनेलप्रमुखांनी आपल्या गटाच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत . यासाठी मतदारांना विविध प्रकारच्या आश्वासनांची खैरातही वाटली जायचे आहे. तर विरोधकांकडूनही प्रतिस्पर्धी गटापेक्षा आपण कसे सरस ठरू यासाठीही नव-नवे फंडे वापरून मतदारांचा कौल आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.