अमरावती : कोरोनामुळे जिल्ह्यातील तीन बालकांचे आई आणि वडील असे दोन्ही पालक हिरावले आहेत. अशा बालकांचे पालकत्व स्वीकारण्यास व प्रतिबालक पाच लाख रुपये त्यांच्या नावे मुदत ठेव ठेवण्यात येणार आहे. शासनाच्या आधारामुळे या बालकांचे आता पुनर्वसन होणार आहे.
कोविडच्या संसर्गाने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. अशा बालकांना शासनाधार मिळणार आहे. दरम्यान, या बालकांचे संगोपन करण्यास कोणी नातेवाईक पुढे न आल्यास शासनाच्या बालसंगोपन गृहात दाखल करण्यात येईल. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची जबाबदारी घेण्यास कोणी नातेवाईक व कुटुंबातील अन्य सदस्य तयार असल्यास अशा बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ दिला जाईल. बालसंगोपन योजनेच्या अनुदानात प्रतिबालक १,१०० रुपये मिळणार आहेत. या अनाथ बालकांच्या मानसिक पुनर्वसनासोबतच त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे उपजीविकेचे कायमस्वरूपी पुनर्वसन होईल यादृष्टीने कृती आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
पाईंटर
पिता गमावलेली बालके : ४१
आई हिरावलेली बालके : ०७
आई-वडील मृत झालेली बालके : ०३