लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आरक्षणासह प्रलंबित विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाद्वारा गुरुवारी जिल्हा बंदची हाक दिली होती. याला जिल्ह्यात शतप्रतिशत प्रतिसाद मिळाला. सकल मराठा समाजाच्या नियोजनानुसार प्रत्येक बांधवाने या आंदोलनात सहभाग घेऊन संबंधित परिसरात १०० टक्के बंद पाळण्याची काळजी घेतली. सकाळी ९ नंतर शहरातील राजकमल चौकात हजारोंच्या संख्येने सकल मराठा बांधव जमले. यामध्ये सर्व पक्ष व सर्व पंथीयांचा सहभाग होता. या ठिय्या आंदोलनात काळ्या पहेरावात असलेल्या मराठा भगिनी मध्यवर्ती भूमिकेत होत्या.शहराच्या प्रत्येक भागातून युवकांनी जत्थ्याने मराठ्यांचा जयघोष व शासनाचा निषेध करीत राजकमल चौकात ठाण मांडले. यावेळी सकल मराठा समाजाच्या मागण्यांसाठी बलिदान देणाऱ्या २३ युवकांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. मराठा समाजाच्या ज्वलंत मागण्या विनाविलंब मंजूर करण्याची गरज असताना शासनाद्वारा दिरंगाईचे धोरण अवलंबिले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या ज्वलंत विषयावर राज्य शासन तारखांवर तारखा देऊन मराठा समाजाची दिशाभूल करीत असल्याचा प्रचंड रोष आंदोलकांमध्ये दिसून आला. जिल्हाभरात रास्ता रोकोसह विविध मार्गांनी आंदोलन करण्यात आले. दिवसभर मराठ्यांच्या गनिमी काव्याने शासन-प्रशासनाला मात्र चांगलाच घाम फोडल्याचे दिसून येत आले.सोशल मीडियावरून साद-प्रतिसादजिल्हा बंदच्या निमित्ताने सकल मराठा समाजाचे काही ग्रुप सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. बंदला न जुमानण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती या ग्रुपच्या माध्यमातून होताच शेकडो मराठा लगेच धाव घेत. अशाप्रकारे एकाच वेळी शहरात कुठे, काय सुरू आहे, याची सचित्र माहिती क्षणात मिळत होती. युवकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.पाच मराठा युवक नजरकैदेतसकल मराठ्यांच्या प्रत्येक आंदोलनात छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अंंबादास काचोडे यांना पोलीस नजरकैदेत ठेवण्याचे प्रकार घडले आहेत. जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी काचोडेसह दिलीप मोरे, संदीप जगताप, अमोल कदम, गोपाल शेरेकर या मराठा युवकांना राजापेठ पोलिसांनी सकाळी रुक्मिणीनगरातून ताब्यात घेतले व नंतर सोडून देण्यात आले. या प्रकारामुळे सकल मराठा समाजाच्यावतीने प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला.शिवपरिवाराची संस्था सुरू का? सकल मराठ्यांनी विचारला जाबजिल्हा बंदमध्ये अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी बुधवारीच जिल्हाधिकारी तसेच कुलसचिवांनी शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. जिल्हा बंदची हाक असताना मराठ्यांची म्हणविणाऱ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यालय सुरू ठेवल्याने सकल मराठ्यांनी धाव घेऊन उपस्थितांना जाब विचारला. याबाबतचे थेट प्रक्षेपण सोशल मीडियावरदेखील करण्यात आले. लगेच सर्व कर्मचारी बाहेर निघाले.पेट्रोल पंपावर बंदोबस्तसकाळपासून शहरातील पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते. एक-दोन ठिकाणी सुरू करण्याचा प्रकार झाला. मात्र, सकल मराठ्यांनी धाव घेताच तातडीने बंद करण्यात आले. वेळीच पोलिसांना पाचारण करुन तेथे बंदोबस्त लावण्यात आला. पेट्रोल पंप सुरू होतील, या आशेवर मोठ्या प्रमाणावर नागरिक यावेळी दुचाकी घेऊन पंपासमोर उभे होते.
शासन-प्रशासनाला फोडला घाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 01:19 IST