अभियान : दोन तालुक्यातील तीन गावांमध्ये कारवाई तर २३१ जणांचा गुलाब पुष्प देऊन सत्कारअमरावती : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने जिल्हा स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याकरिता गुडमॉर्निंग पथकाची स्थापना करण्यात आले आहे. या पथकाकडून सोमवात ते बुधवार या तीन दिवसात अंजनगाव सुर्जी आणि भातकुली तालुक्यातील तीन गावात राबविलेल्या मोहिमेत उघडयावर शौचास जाणाऱ्यांचे २३१ लोटे जप्त केले आहेत. तर परिसरात घाण करणाऱ्यांना २३१ ग्रामस्थांना गुलाब पुष्प देऊन त्यांच्या सत्काराचा अनोखा उपक्रम गांधीगिरी राबवून केला जात आहे. या गांधीगिरीला सोमवार पासून जिल्हाभरात सुरूवात झाली आहे. धाडसत्राचे दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी भातकुली तालुक्यात टाकलेल्या धाडीत मंग़ळवारी ७५ जणांचे लोटे जप्त केले आहेत तर ९५ नागरीकांना पुष्प गुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला. बुधवारी भातकुली तालुक्यातील एका गावात टाकलेल्या धाडीत ९३ लोटे जप्त केले आहेत. तर ९५ नागरीकांना गुलाब पुष्प देण्यात आले. या दोन्ही गावात गुडमॉर्निंग पथकाने सकाळी ५ वाजता धाड टाकली. यावेळी उघडयावर शौचास जाणाऱ्यांची एकच भंबेरी उडाली होती. गावातील लोक घरात शौचालय बांधण्याऐवजी बाहेर शौचास जात असल्याचे धक्कादायक चित्र अद्यापही पहावयास मिळते. त्यामुळे जिल्हा परिषदेने गुडमॉर्निंग पथकाची स्थापना करून उघडयावर शौचास जाणाऱ्यांचे लोटे जप्त करण्याचा अनोखा उपक्रम ८ फेब्रुवारीपासून सुरु केला. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे डेप्युटी सीईओ यांच्या मार्गदर्शनात बीआरसी कर्मचारी प्रदीप बद्रे, धनंजय तिरमारे, सागर टाकळे, बाळू बोर्डे, निलेश नागपूरकर, अजिंक्य काळे, दिनेश गाडगे, दर्शना गौतम यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच, सचिव, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, पोलीस पाटील ग्रामंचायत सदस्य आदींच्या उपस्थित ही गांधीगीरी करण्यात आली. यावेळी उघडयावर शौचास जाणाऱ्या महिलांना आशा कर्मचारी ग्रामपंचायातीच्या महिला पदाधिकारी, अंगणवाडी सेविका यांनी तर पुरूषांना अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, सचिव यांचे हस्ते पुष्प गुच्छ देण्यात आले . तीन दिवसात जिल्हा परिषदेच्या गडमॉर्निंग पथकाने तीन गावातून २३१ लोटे जप्त केले आहेत.जिल्हा परिषदेच्या गुडमॉर्निग पथकाकडून सोमवारपासून विविध गावात धाडी टाकल्या जात आहे. या गांधीगिरीच्या अभिनव उपक्रमामुळे गावागावात उघडयावर शौचास जाणाऱ्याची भंबेरी उडत आहे. शौचालयाचे महत्व व उपयोग करण्याबाबत त्यांना माहीत देऊन नागरीकांना शौचालय बांधण्यास प्रवृत्त केले जात आहे.-संजय इंगळे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
गुडमॉर्निंग पथकाकडून उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे २३१ लोटे जप्त
By admin | Updated: February 11, 2016 00:33 IST