अमरावती : अचलपूर एमआयडीसी परिसरातील गोडावून फोडून पावणेतीन लाखांवर कॅटरिंगचे साहित्य चोरून नेणाऱ्या कुख्यात
तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
अतुल रामदास खडगे (२६, रा. अब्बासपुरा, अचलपूर), अमोल प्रकाश शहाणे (२४, रा. चौखंडेपुरा, अब्बासपुरा, अचलपूर) व सुमीत अशोक वाढवे (३०, रा. तारानगर, परतवाडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. २८ मे रोजी याबाबत अचलपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी कॅटरिंगचे एकूण २ लाख ९२ हजारांचे सामान चोरून नेले होते.
गुन्ह्याचा तपास करीत असताना गजू ऊर्फ गजानन खडगे, अतुल खडगे, अमोल शहाणे, सुमीत बाढवे व अन्य एका साथीदाराने चोरी केल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यांच्यावर पाळत ठेवल्यानंतर अतुल खडगे, अमोल शहाणे यांना सुरुवातीला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर गजानन खडगे व सुमीत वाढवे (चालक) तसेच आणखी एक इसम यांनी चारचाकी वाहनाने, तर गजानन खडगे याचे दुचाकीने २६ मे रोजी रात्री अचलपूर एमआयडीसी परिसरात जाऊन एका गोडाऊनच्या फाटकाचे व शटरचे कुलूप तोडून गोडाऊनचे आत ठेवलेले कॅटरिंगचे सामान चोरून नेल्याची कबुली दिली. त्यावरून सदर गुन्ह्यातील चालक सुमीत वाढवे यालासुद्धा ताब्यात घेतले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, हेडकॉन्स्टेबल त्र्यंबक मनोहर, नायक पोलीस कॉन्स्टेबल सुनील महात्मे, प्रमोद खर्च, योगेश सांभारे, सैयद अजमत, प्रवीण अंबाडकर, अमोल केंद्रे, सागर धापड, सरिता चौधरी व चालक कमलेश पाचपोर यांनी केली आहे.