अंजनगाववासीयांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनअंजनगाव सुर्जी : सहा महिन्यांपासून अंजनगाव सुर्जी नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय व सार्वजनिक हिताची कामे रखडली आहेत. कायमस्वरुपी मुख्याधिकारी देण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.यापूर्वीचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची बदली झाल्यानंतर त्यांचा प्रभार दर्यापूर व परतवाडा येथील मुख्याधिकाऱ्यांकडे आलटून-पालटून देण्यात येतो. पण हे दोन्ही शहराचे अधिकारी त्यांच्या स्वत:च्याच कामाच्या व्यापात अडकून असल्यामुळे त्यांना अंजनगावला वेळ देणे शक्य होत नाही. काँग्रेसच्या राजवटीत पालकमंत्री विखे पाटील यांनी ही समस्या सोडविली नाही. त्यांनी दोन कोटी रूपयांचे विशेष अनुदान न. प. ला दिले. पण या पैशापेक्षाही येथे कायमस्वरुपी प्रशासकीय अधिकारी महत्त्वाचा होता. या समस्येकडे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी लक्ष घालून तातडीने मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सत्ता परिवर्तनानंतर हनिफा बी मो. शरीफ यांनी कार्यभार सांभाळला होता. पण ज्या अपेक्षेने विकासाची कामे मार्गी लागण्याचा कयास होता त्यानुसार काम झाले नाही. कारण येथे कायम मुख्याधिकारी नाही. नगरसेवक जिल्हाधिकारी कार्यालयातून हात हालवून परत येतात. याबाबत सत्ताधारी काँग्रेसचे गटनेते व नगरसेवक नीलेश पसारी यांना विचारणा केली असता त्यांनी या समस्येचा सतत पाठपुरावा सुरू असून निकाल लागल्यावर येथे कायमस्वरुपी मुख्याधिकारी येणार असल्याचे सांगितले. मुख्याधिकारी नसल्यामुळे पालिकेतील वेतन वाटप, साफसफाई व बांधकामविषयक कामे ठप्प पडली आहेत. शहरात आरोग्याची समस्या उग्ररूप धारण करीत आहे.
कायमस्वरुपी मुख्याधिकारी द्या!
By admin | Updated: October 20, 2014 23:05 IST