अमरावती : दरवर्षी जिल्हा परिषदेकडून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो, परंतु सन २०१९-२० चे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार अद्याप देण्यात आले नाही. हे पुरस्कार येत्या ३ जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने निवेदनाव्दारे झेडपी अध्यक्ष, सीईओ, शिक्षण सभापती व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.
राज्य शासनाने ३ जानेवारी हा दिवस "महिला शिक्षण दिन" म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजाला मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. देशातील महिलांसाठी महात्मा फुले यांनी पहिली शाळा सुरू केली, सावित्रीबाई फुले स्वत: शिक्षण घेऊन महिलांना शिकविण्याचे काम केले. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा जन्मदिन "महिला शिक्षण दिन'''' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवसाचे औचित्य साधून प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखेने जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा येत्या ३ जानेवारी घेण्याची मागणी केली. यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत, जिल्हा सरचिटणीस संभाजी रेवाळे, राज्य प्रसिध्दीप्रमुख राजेश सावरकर, जिल्हा कार्याध्यक्ष मनीष काळे व पदाधिकारी उपस्थित होते.