अन्नत्याग उपोषणाची सांगता, मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन
मोर्शी : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधकाम केलेल्या घरकुलधारकांना अंतिम टप्पा त्वरित वितरण करण्यात येईल, असे आश्वासन पालिका मुख्याधिकाऱ्यांनी दिले. परिणामी २३ मार्चपासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाची सांगता झाली. मुख्याधिकारी गीता ठाकरे यांनी उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली. भाजपचे शहराध्यक्ष रवि मेटकर यांनी नगरपरिषदेच्या आवारात अन्नत्याग उपोषण व इतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत साखळी उपोषण सुरू केले होते.
सध्या शहराला जुन्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा सुरू आहे. ही टाकी जीर्ण झाल्याचे लक्षात घेऊन जुन्या टाकीवरून नवीन पिण्याच्या पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईन जोडून तेथून शहराला पाणीपुरवठा सुरू करता येईल, असेसुद्धा मुख्याधिकारी यांनी स्पष्ट केले. हरितपट्टा योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची विभागीय चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. यावेळी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष आप्पा गेडाम, गटनेता नितीन राऊत, मनोहर शेंडे, महिला बालकल्याण सभापती सुनीता कोहळे, छाया ढोले, प्रीती देशमुख, नगरसेवक हर्षल चौधरी, माजी नगरसेवक अजय आगरकर, ज्योतिप्रसाद मालवीय, माजी नगराध्यक्ष कैलास फंदे, सुनील ढोले, रावसाहेब अढाऊ, आकाश ढोमणे, सुनीता कुमरे, प्रतिभा फंदे, शीला धावडे, अनिता लांजेवार इत्यादी भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.