इसिसची धमकी : १५ आॅगस्टपर्यंत खडा पहाराबडनेरा : ईसिस या दहशतवादी संघटनेने अमरावती रेल्वेस्थानक बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची लेखी धमकी दिल्याच्या पार्श्वभूमिवर १५ आॅगस्टपर्यंत सर्वच सुरक्षा यंत्रणा याकडे घारीची नजर ठेवून आहे. रेल्वे स्थानकाला छावणीचे स्वरुप आले आहे. प्रत्येक संशयितावर बारकाईने नजर ठेवल्या जात आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाकडून याची गंभीरतेने दखल घेतली आहे. रेल्वे सुरक्षा बल, शहर पोलीस, रेल्वे पोलिसांचा ताफा अमरावती रेल्वे स्थानक येथे तैनात करण्यात आला आहे. शनिवार ६ रोजी अमरावती रेल्वे स्थानकाची अकोल्याच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या डॉगस्कॉडकडून कसून तपासणी करण्यात आली. रेल्वे प्रवासी गाड्या, प्रवाशांच्या बॅग्स, रेल्वेस्थानक परिसरात असणारे बेवारस साहित्य, पार्सल, कार्यालयातील सामानाची डॉगस्कॉडच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. प्रत्येक संशयित व्यक्तिवर सुरक्षा यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक सी.एस. पटेल, शहर पोलीस, रेल्वे पोलीस अमरावती रेल्वेस्थानक परिसरातील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहेत. स्वातंत्र्य दिन डोळ्यासमोर ठेवून ईसिस या दहशतवादी संघटनेने धमकीचे पत्र जारी केले आहे. १५ आॅगस्ट व त्यानंतरही सर्वच सुरक्षा यंत्रणा अमरावती रेल्वे स्थानकासह इतरही महत्वाच्या ठिकाणी घारीची नजर ठेवून आहे. धमकी पत्रानंतर शनिवारी केलेल्या अमरावती रेल्वे स्थानकाच्या तपासणीत सुरक्षा यंत्रणेला कुठलीही संशयित व्यक्ती, बॅग्स् आढळून आलेली नाही. (शहर प्रतिनिधी)
घारीची नजर!
By admin | Updated: August 6, 2016 23:52 IST