पेरणीपूर्वीच संपली विम्याची मुदत : प्रहारचा आंदोलनाचा इशाराचांदूरबाजार : ग्रामपंचायतीच्या हद्दीतील साफसफाई, नाल्या उपसणे, आरोग्याची कामे, विजेचे दिवे लावणे आदी कामे ग्रामपंचायतीच्या सामान्य फंडातून केली जाते. परंतु ६ एप्रिल २०१५ च्या शासन निर्णयानुसार इमारत कर आकारणी बंद असल्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील सामान्य फंडात ठणठणाट निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविली जात नाही. गावातील नागरिकांच्या रोषाला सरपंचासह इतर पदाधिकारी बळी पडतात. याशिवाय शेतकऱ्यांना लागणाऱ्या सातबारासाठी हेलपाटे घ्यावे लागत आहे. शासनाने संगणकीय सातबारा उपलब्ध करून देण्याचे सुरू केले. मात्र यंत्रणेत बऱ्याच त्रृटी असल्यामुळे शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या मोसमात त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना मिळणारे संगणकीकृत सातबारे अत्यंत चुकीचे मिळत आहेत. ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी इंटरनेटची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना सातबाऱ्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. हा सातबारा मिळाल्यानंतर तो चुकीचा असल्यामुळे त्याच्या दुरूस्तीकरिता शेतकऱ्याला पुन्हा तलाठ्याकडे जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज काढण्यासाठी अडचणी येतात. सातबारा एका ठिकाणी तर नकाशासाठी तलाठ्याकडे जावे लागते. यात वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे आणि त्यात हेलपाटे मारावे लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत चालला आहे. शासनाने संगणकीकृत सातबाऱ्याची मोहीम तर राबविली मात्र त्यात येणाऱ्या अडचणी व त्रुटींची दुरूस्ती केली नाही. इतकेच नव्हे, तर तलाठ्यांना आवश्यक लॅपटॉपचीही पूर्तता केली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातही बऱ्याच शेतकऱ्यांची पावसाअभावी पेरणी रखडली आहे. सध्या तालुक्यात ४० टक्के पीक विम्याची मुदत ३० जूनपर्यंत असल्यामुळे शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहे. या अडचणी लक्षात घेता शासनाने ग्रा. पं. कर आकारणीवरील बंदी उठवून निधी उपलब्ध करून द्यावा. संगणकीकृत सातबारे दुरूस्त होईपर्यंत तलाठ्याकडून हस्तलिखीत सातबारे देण्याला परवानगी द्यावी. पीक विम्याची रक्कम वाढवून द्यावी, सर्व बँकांना नवीन व जुन्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश द्यावे, या मागणीचे निवेदन प्रहारचे ग्रा. पं. सदस्य व बाजार समितीचे माजी सभापती मंगेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. निवेदनावर पं.स. सभापती राजेश सोलव, अजय तायडे, गजानन ठाकरे, शिवा भुयार, नंदकुमार अर्डक, सरपंच सूरज चव्हाण, सागर धनसांडे, मंगेश शेळके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)नवनियुक्त पदाधिकारी पेचातग्रामपंचायतीच्या सामान्य फंडातून केली जाणारी कामे जवळपास तालुक्यातील अनेक गावांत बंद असल्याने सत्तारुढ पदाधिकाऱ्यांविरुद्ध तीव्र असंतोष खदखदत आहे. कारण ग्रामपंचायतीच्या तिजोरीत ठणठणाट असल्याने अंतर्गत रस्ते, नाल्यांंची कामे रखडली आहेत. सध्या पावसाळ्याला सुरुवात झाल्याने समस्येतही वाढ झाली आहे. गावांत खडीकरणाची कामे अर्धवट असल्याने सर्वत्र चिखल साचला आहे. त्यामुळे गावाचे सौंदर्यीकरण करावे तरी कसे, असा पेच अधिकाऱ्यांना पडला आहे.
सामान्य फंडात ठणठणाट, पुनर्वसन रखडले
By admin | Updated: July 4, 2015 00:52 IST