पालिका प्रशासन झोपेत : वर्षभरापासून पाणीगळतीची दखल नाहीनरेंद्र जावरे अचलपूरशहरातील किल्ला व महल भागात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला वर्षभरापासून गळती लागली आहे. निवेदन देऊनसुध्दा पालिका प्रशासनाने दुरूस्ती केली नाही. परिणामी परिसरातील नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून असलेल्या हातपंपातून घाण पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. शहरात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टाकण्यात आलेली पाईप फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचे दृश्य ठिकठिकाणी आढळून येते. शहरातील महल आणि किल्ला या वॉर्ड क्रमांक ६ मध्ये वर्षभरापासून पाईप लाईनला गळती लागल्याचे निवेदन परिसरातील नागरिकांनी दिले होते. परंतु पालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत त्यावर कुठलीच उपाययोजना करण्यात आली नाही. पाईप लाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याने साचलेल्या पाण्यात डुकरे, कुत्री बसतात. हेच पाणी पुन्हा पाईप लाईनमधून नळाद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. हातपंपातूनही गढूळ पाणीनळातून गढूळ पाणीपुरवठा होत असताना नागरिकांनी किल्ला परिसरात असलेल्या हातपंपातून पाणी घ्यायला सुरूवात केली असता त्यांना प्रचंड धक्का बसला. हातपंपातून येणारे पाणी गढूळ व पिवळसर असल्याने मोठ्या प्रमाणात जलजन्य रोग पसरण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. वर्षभरापासून मुख्य जलवाहिनी फुटली आहे. याची तक्रार पालिकेला दिली होती. मात्र, दुरूस्ती करण्यात आली नाही. नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. परिणामी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.- शे.कदीर दुकानदार, नागरिक, किल्ला वॉर्ड, अचलपूर.या भागातील पाईप लाईनच्या दुरूस्ती संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना दिल्या आहेत. तातडीने दुरूस्ती केली जाईल.- विलास काशिकर, नगसेवक, अचलपूर.नळातून गढूळ पाणी येत असल्याने नागरिक हातपंपाचा वापर करतात. मात्र, तेही पाणी गढूळ येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. - शे. रेहान खान,नागरिक.
अचलपूरच्या महल परिसरात गढूळ पाणी
By admin | Updated: June 7, 2015 00:28 IST