अमरावती : देशभरात तोतयेगिरीचे ५० पेक्षा अधिक गुन्हे शिरी असलेल्या कुख्यात इराणी टोळीतील चार सदस्यांना अटक करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. त्यांच्या अटकेमुळे पोलिस असल्याची बतावणी करून तोतयेगिरीच्या एकुण २५ गुन्हयांची कबुली त्यांनी दिली आहे. यात अमरावती ग्रामिण पोलिसांमध्ये नोंद असलेल्या नऊ गुन्हयातील २२१ ग्रॅम सोन्याचे दागिणे, चारचाकी वाहन, खोटे दोन पोलीस ओळखपत्र, क्राईम प्रेस रिपोर्टरचे खोटे ओळखपत्र असा सुमारे २१ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस अधीक्षक विशाल आनंद व पोलिस निरिक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वातील ‘टिम एलसीबी’ने धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव येथे नाकाबंदी करून बीडकडे जाणाऱ्या कारचा पाठलाग करून चारही तोतया पोलिसांना पकडले.
इराणी जहीर अब्बास ऊर्फ मोटा अब्बास शेकु अली (वय ४० वर्षे, रा. शिवाजी नगर, परळी वैजनाथ, जि. बिड), लाला ऊर्फ गांधी समीर शेख (वय ४८ वर्ष रा. इंदीरा नगर, आंबेवली जि. ठाणे), वसीम शब्बीर ईराणी (वय २५ वर्ष) व नझीर हुसेन अजिज अली (वय ५२ वर्ष, दोघेही रा. बिदर, कर्नाटक) अशी अटक तोतया पोलिसांची नावे आहेत. आरोपी इराणी जहीर अब्बास ऊर्फ मोटा हा त्याच्या साथीदारासह चारचाकी वाहनाने नागपूरहून परळीकडे जात असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्यानुसार पथकाने देवगाव चौकात नाकाबंदी केली. तथा पुलगांवच्या दिशेने येणाऱ्या पांढ-या रंगाच्या विना क्रमांकाची एसयुव्ही थांबवून तपासणी केली असता त्यात चारही आरोपी मिळून आले. पोलिस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी शनिवारी प्रसिध्दीमाध्यमांशी संवाद साधला.