धामणगाव रेल्वे : उघड्यावर तयार केलेले किंवा विकलेले खाद्य पदार्थ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असताना शहरातील काही हॉटेल्स व स्वीटमार्ट नागरिकांच्या जीवाशी खेळत असून जिल्ह्याच्या अन्न व औषधी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. पावसाळ्यात साथीचे रोग पसरण्याची शक्यता असते़ साथीच्या रोगांना आळा घालण्याकरिता उघड्यावर तयार केलेले किंवा उघड्यावर बसून विकलेले खाद्य पदार्थ खाऊ नयेत, अशा सूचना आरोग्य विभागाकडून केल्या जातात. उघड्यावर तयार केलेल्या खाद्य पदार्थांवर बसलेल्या माशांमुळे साथीचे रोग तीव्रतेने पसरतात़ त्यामुळे उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करण्यास परवानगी देता येत नाही़ संबंधित हॉटेल किंवा स्वीटमार्टमध्ये स्वच्छता असणे गरजेचे आहे़ माशांचा, डासांचा प्रादुर्भाव होणार नाही यावर लक्ष ठेवणे आवश्यकता आहे़ परंतु महिन्याकाठी जिल्ह्यातून येणारे अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी पॉकेट संस्कृती जपत असल्यामुळे या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे़आज शहरातच नव्हे तर तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर, अंजनसिंंगी, तळेगाव दशासर या मोठ्या गावात हॉटेल्स व स्वीटमार्ट आहेत़ या संबंधित हॉटेल्सना महिन्याकाठी केवळ कागदोपत्री भेट अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी देत आहेत़ हॉटेल्स स्वीटमार्ट व्यवसायासाठी जेव्हा परवानगी दिली जाते तेव्हा हॉटेल किंवा स्वीटमार्टमध्ये किंवा ज्या ठिकाणी पदार्थ तयार करण्यात येते त्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यात येईल असे हमीपत्र लिहून दिले जाते़ तिथे स्वच्छता कशी असावी याबाबात काही नियम आहे़ परंतु या नियमाचे या व्यावसायिकांकडून पालन केले जात नाही़ स्वीटमार्टचे पदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी अस्वच्छता दिसून येते़ वास्तविक जिल्ह्याच्या अन्न भेसळ व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दुकानांना भेट देऊन तिथे अटी व शर्तीचे पालन होते किंवा नाही हे पाहणे अपेक्षित आहे़ मात्र महिन्यातून तपासणी करणारे काही अधिकारी ज्या हॉटेल व स्वीटमार्टमध्ये भेटी देतात तेथील व्यवसायीक हे केवळ आपल्या हिताच्या बाबीकडे लक्ष देतात़ अन्न व औषधी प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून गलिच्छ हॉटेल्स व दूषित पदार्थांची विक्री करणाऱ्या स्वीटमार्ट मालकांविरूध्द फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे़ (तालुका प्रतिनिधी)
हॉटेल्स, स्वीटमार्टकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ
By admin | Updated: June 19, 2014 23:35 IST