लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गाडगेनगर हद्दीतील एका आठ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अखेर शिताफीने मंगळवारी अटक केली. देवेंद्र अंबादास कोंडे (३३, रा. नेमाणी जिनिंग फॅक्टरी क्वार्टर) असे आरोपीचे नाव आहे.गाडगेनगर हद्दीत २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता एका दुचाकीस्वाराने आठ वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी २३ ऑक्टोबर रोजी या घटनेची तक्रार गाडगेनगर पोलिसांत नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंदविला. या घटनेच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, डीबीचे पोलीस हवालदार अहमद अली, भारत वानखडे, प्रशांत वानखडे यांनी तपास सुरू केला. सीसीटीव्हीत दुचाकीवरील केवळ चार आकडे अस्पष्ट दिसत होते. पोलिसांनी तर्कवितर्क लागून तब्बल ४० प्रकारच्या विविध सीरीजच्या क्रमांकाची पडताळणी करून मुख्य वाहनाचा क्रमांक शोध घेण्याचे प्रयत्न केले. अखेर ५६०३, ६६०५ व ८६०८ या तीन क्रमांकाची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाला पत्राद्वारे मागितली. महिना उलटून गेल्यानंतरही ती माहिती मिळाली नव्हती. तसेच आरटीओ कार्यालयाकडून माहिती पुरविण्यास टाळाटाळ केली गेली. त्यामुळे पोलिसांनी शहरातील शोरूमचालकांना पत्र दिले. संबंधित तिन्ही क्रमांक देण्यात आले. त्यावेळी एमएच २७ बीजी ८६०८ हा क्रमांक पुढे आला. त्यानुसार पुन्हा आरटीओ राम गित्ते यांना भेटून पोलिसांनी या क्रमांकाची माहिती काढून संबंधित वाहनचालकाचा पत्ता मिळविला. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सामटकर करीत आहेत.