अमरावती : येथील हिंदू स्मशानभूमीच्या गॅस दाहिनीत शनिवार, रविवार असे दोन दिवसांत २१ कोरोना मृतदेहांवर गॅस दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच ३७ मृत व्यक्तींचा सरणावर अंत्यविधी आटोपला. कोरोना संसर्गामुळे फेब्रुवारीत मृत्युसंख्या बळावल्याची माहिती हिंदू स्मशानभूमीचे प्रबंधक एकनाथ इंगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रकोप वाढल्याने मृत्युसंख्या वाढली आहे. त्यामुळे येथील हिंदू स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी गर्दी वाढली आहे. गॅस दाहिनी सकाळी ८ ते रात्री ९ वाजतापर्यंत निरंतरपणे सुरू असल्यामुळे स्मशानभूमी परिसराचे तापमान वाढले आहे. महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या बघता हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेहाची संख्या वाढत असल्याने नियोजन करताना दमछाक होत असल्याचे चित्र आहे. १३ ते १७ फेब्रुवारीदरम्यान गॅस दाहिनीत तांत्रिक बिघाड आला होता. या पाच दिवसांत कोरोना मृतदेहांचे अंत्यसंस्कार सरणावर करण्यात आले. त्याकरिता स्वंतत्र ओट्यांची व्यवस्था हिंदू स्मशानभूमीचे अध्यक्ष आर. बी. अटल यांनी केली होती. त्यानंतर गॅस दाहिनी दुरुस्त झाली असून, कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. शनिवारी ११ कोरोना मृतदेहावर गॅस दाहिनीत अंत्यसंस्कार झाले. २६ मृत व्यक्तिंना सरणावर, तर एकावर दफनविधी करण्यात आला. रविवारी १० कोरोना मृतदेहांवर गॅस दाहिनीत अंत्यसंस्कार पार पडले असून, ११ मृत व्यक्तींचा सरणावर अंत्यविधी आटोपला.