अमरावती : शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीत मिळणाऱ्या शालेय पोषण आहाराचा आर्थिक भत्ता थेट हस्तांतरण डीबीटीव्दारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने यासंदर्भात आदेश दिले असून, बँक खाते उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांची खाती काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली आहे.
राज्य शासनामार्फत शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार अंतर्गत अन्नधान्याचे वाटप करण्यात येते. यांना कोरोनामुळे शाळा बंद असल्याने त्याचे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे २०२१ च्या उन्हाळी सुटीतील अन्नधान्याचे वाटप न करता त्याची आर्थिक रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. यासाठी सर्व विद्यार्थ्याची आधार लिंक असलेली बँक खाती काढण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांची बँकेत खाती काढलेली नाही. त्या विद्यार्थ्यांच्या पालकांची संपर्क करून तातडीने बँकेची खाती काढावीत, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून शिक्षण विभागाला दिले आहेत.
बॉक्स
९ जुलैपर्यंत अहवाल मागविला
विद्यार्थ्यांची बँक खात्याची माहिती अद्ययावत करून ९ जुलैपर्यंत शिक्षण संचालकांकडे जमा करावी, असे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती देताना शाळेचे नाव यूडायस कोड, गावाचे नाव, विभागाचे नाव, विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, बँकेचे नाव, बँकेची शाखा, खाते क्रमांक, आयएफसी कोड आणि आधार क्रमांक अशी माहिती द्यावी लागणार आहे. सर्व शाळांनी ही माहिती तातडीने भरून त्वरित प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे पाठवायची आहे.