अमरावती : दी अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या सत्तेवर असलेल्या नेतृत्वाने पॅनेलमधील संचालकांना सापत्न वागणूक दिल्याचा आरोप असंतुष्ट गटाने केला आहे. त्यामुळे ७ संचालकांनी नाराज होऊन वेगळा गट मांडल्याची माहिती असून, या प्रकाराने शिक्षक बँकेतील राजकीय वातावरण तापले आहे.
कोरोना संकटानंतर येत्या काही महिन्यात जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगूल वाजण्याची शक्यता असून यातील वरिष्ठ संचालक आगामी अध्यक्षपदाचे दावेदार तर होणार नाही ना, अशा अनेक शंकेने बँकेतील सत्ताधारी प्रगती पॅनेलमधील शिक्षक समितीचे ७ संचालकांनी वेगळा गट तयार केला आहे. या असंतुष्ट गटाने बँकेच्या पदाधिकाऱ्यांकडून अपमानजनक वागणूक व बँक सभासदाच्या हिताचे निर्णय न घेणे यासह अन्य कारणांना कंटाळून सत्ताधारी पॅनेलमधून वेगळा गट स्थापन केला आहे. आगामी निवडणुकीत हा गट स्वतंत्र पॅनेल टाकून व अन्य घटक संघटनांची मोट बांधण्याची तयारी सुरू केल्याचे शिक्षकांमध्ये बोलले जात आहे. अशातच नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत आतापर्यंत पहिल्यांदाच संचालकांनी इतर सहा संचालकांना सोबत घेऊन संपूर्ण ठरावाला विरोध केला. यामुळे कर्जावरील एक टक्का व्याजदरही कमी करण्यास भाग पाडले. बँकेत सत्तेत असलेल्या प्रगती पॅनेलचे ११ संचालक होते. यापैकी मनोज ओंळबे, छोटूसिंग सोमवंशी, प्रमोद ठाकरे, विजय पुसलेकर, मधुकर चव्हाण, रवींद्र निघोंट व सुदाम राठोड संचालक नाराज असल्याची माहिती ओंळबे यांनी दिली.
कोट
संचालकांना शिवीगाळ अमानवीय वागणूक देणे, ही बाब मनाला चटका लावून गेली. हे युद्ध कोणत्याही पदासाठी नव्हे, तर स्वाभिमानासाठी आहे. आम्ही ते लढण्यास सज्ज आहोत.
- मनोज ओळंबे,
संचालक, शिक्षक बँक