रक्तदाता संघाची चळवळ : चार महिन्यांत २३ शिबिरे, १ हजार २३५ रक्तपिशव्या वरुड : ‘रक्तदान श्रेष्ठदान’ असे म्हणतात. परंतु हे रक्त वेळेवर मिळाले नाही तर अनेकांना प्राणही गमवावे लागतात. त्यात आर्थिक विपन्नावस्था असेल तर गोरगरिबांना रक्तासाठी वणवण भटकावे लागते. ही परिस्थिती उदभवू नये, या उद्देशाने गोरगिरबांची ससेहोलपट थांबविण्याकरिता ग्रामीण रूग्णालयीन रक्तदाता संघ स्थापन करण्यात आले आहे. या संघाची चळवळ मोठ्या प्रमाणात फोफावली. सद्यस्थितीत तालुक्यातील शेकडो गरीब रूग्णांना मोफत रक्त या संघाद्वारे उपलब्ध होत आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार आणि चरण सोनारे यांनी काही समाजसेवी लोकांसोबत चर्चा करुन ग्रामीण रुग्णालयाशी संलग्न रक्तदाता संघ स्थापन केला. जानेवारी महिन्यात स्थापन झालेल्या ग्रामीण रुग्णालय संलग्नित रक्तदाता संघाने चार महिन्यांत तब्बल २३ रक्तदान शिबिरे घेण्यात आली. यातून १२३५ रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या. शेकडो गोरगरीब रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्यात आला. ही रक्तदान चळवळ वेगाने सुरु असून समाजातील सर्व घटकांचे सहकार्य मिळत आहे. या संघाच्या माध्यमातून सर्वाधिक रक्तसंकलन करुन जिल्हा सामान्य रुग्णालयाला देण्यात आले. रक्त प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येकाला रक्ताची गरज भासते. परंतु उपलब्धतेनुसार ते मिळते. प्रसंगी विकत घेऊन रूग्णाचे प्राण वाचविण्याची वेळ येते. मात्र, गोरगरिबांना आर्थिक अडचणीमुळे हे शक्य होत नव्हते. यामुळे रक्ताअभावी अनेकांचे प्राण गेले. त्यामुळे गरिबांना मोफत रक्तपुरवठा कसा करता येईल, या दृष्टीने वरुडच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार आणि चरण सोनारे यांनी रक्तदाता संघाची स्थापना केली. जानेवारीपासून एप्रिलपर्यंत २३ रक्तदान शिबिरांचे विविध संस्था, मंडळांच्या माध्यमातून आयोजन करुन रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्याची संकल्पना अविरत सुरु केली. वरुड तालुक्यातून झालेल्या रक्तदानातून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात ९०० रक्तपिशव्या आतापर्यंत पुरविण्यात आल्यात. हेच रक्त जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गरजूंना पुरविण्यात येते. त्यामुळे कित्येकांचे प्राण वाचविण्यास मदत होते. या स्तुत्य उपक्रमाची अनेकांनी दखल घेऊन या कार्यात सहकार्य केले आहे. या रक्तदाता संघाने नागपूरच्या कोणत्याही रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गरजू रूग्णांकरिता मोफत रक्तपुरवठ्याची सोय व्हावी म्हणून नागपूरच्या हेडगेवार रक्तपेढीसोबत करार केला आहे. अवघ्या चार महिन्यांत या रक्तदाता संघाने भरारी घेऊन २३५ पिशव्यांचे रक्तसंकलन केले. संघाने वार्षिक नियोजन करुन दर महिन्याला रक्तदान शिबिरे घेण्यात येत आहेत. या रक्तदान चळवळीमध्ये रक्तदाता संघाचे अध्यक्ष जितेंद्र शेटीये, उपाध्यक्ष प्रवीण चौधरी, दिलिप भोंडे, सचिव चरण सोनारे, सहसचिव शैलेश धोटे, कोषाध्यक्ष प्रमोद पोतदार, संघटक सुधाकर राऊत तसेच सदस्य संजय खासबागे, पंकज केचे, योगेश ठाकरे, आशिष वानखडे, मनोहर थेटे, यशपाल जैनसह शहरातील वैद्यकीय अधिकारी, सेवाभावी संस्था कार्य करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)रक्तदान चळवळीत सहभागी व्हा रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याने रुग्णांचे प्राण वाचविण्याकरिता ग्रामीण रुग्णालयाशी संलग्न रक्तदाता संघाची उभारणी करण्यात आली आहे. यातून गरजू रुग्णांना मोफत रक्त देण्याची संकल्पना आहे. याकरिता सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याने रक्तदान शिबिरे आयोजित करण्याकरिता सेवाभावी संस्था, उत्सव समित्या, मंडळे, सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी सहकार्य करावे, तसेच रक्ताची गरज भासल्यास २४ तासांत संबंधितांशी संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच रक्तदाता संघाचे कोषाध्यक्ष प्रमोद पोतदार यांनी केले आहे.
गोरगरिबांना मिळतेय मोफत रक्त!
By admin | Updated: May 9, 2015 00:25 IST