(फोटो/ मनीष)
अमरावती : यापूर्वी सप्टेंबर २०२०मधील कोरोना ब्लास्टमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांना काही प्रमाणात गर्दीला अटकाव केला जायचा. आता त्यापेक्षा कित्येक पटींनी संसर्ग वाढला असताना ना पल्स ऑक्सिमीटरचा वापर आहे, ना थर्मल स्क्रीनिंगचा. अभ्यागतांना वैद्यकीयदृष्ट्या विचारणाही होत नाही. अशाने कसा रोखणार कोरोना, असा खुद्द कर्मचाऱ्यांचाच सवाल आहे.
जिल्ह्यात किमान १४ हजार कोरोनाग्रस्तांची नोंद फेब्रुवारी महिन्यात झालेली आहे. रोज ७०० ते ९०० कोरोनाग्रस्तांनी नोंद या काळात झाली. याशिवाय ९१ मृत्यूदेखील झाले. चाचण्यांमध्ये २० ते ४६ टक्क्यांपर्यंत पॉझिटिव्हिटी व कर्मचारी उपस्थिती ३० टक्क्यांवर आलेली असतानाही कार्यालयांतील गर्दी कमी झालेली नाही. विशेष म्हणजे, एकाही नागरिकाची तपासणी केली जात नाही. कुठेही अटकाव नसल्याने जिल्हा कचेरीत नागरिकांचा बिनधास्त वावर आहे.