धारणी : मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपी आकाश कृष्णा झाडखंडे याला धारणी न्यायालयाने चार महिने पाच दिवसांची शिक्षा ठोठावली. आरोपी हा तुरुंगात असताना त्याच्याविरुद्ध प्रकरण चालविण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यामुळे जितके दिवस तो तुरुंगात होता, तेवढी शिक्षा त्याला सुनावण्यात आली आहे.
समाजात तेढ निर्माण करण्याचा मनसुबा बाळगून आकाश कृष्णा झाडखंडे (२९, रा. काटकुंभ पो. चुरणी ता. चिखलदरा) याने १६ ऑक्टोबर २०२० रोजी स्थानिक हनुमान चौकातील राम मंदिरात अनधिकृतपणे प्रवेश मिळवून तेथील हनुमानाच्या मूर्तीची विटंबना केल्याची फिर्याद मंदिराचे महंत सूर्यप्रकाश नथुराम मिश्रा यांनी धारणी पोलिसांत केली होती. तपास अधिकारी तथा पीएसआय माया वैश्य यांनी चौकशीअंती आरोपीस अटक करून त्याचेविरूद्ध भादंविचे कलम २९५ अन्वये आरोपपत्र दाखल केले होते. माया वैश्य आणि पैरवी कर्ता पोलीस अंमलदार राजेंद्र सोनोने यांच्याकडून दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे प्रथम श्रेणी न्यायाधीश एम. एस. गाडे यांच्या न्यायालयात दोषींविरुद्ध सक्षम पुरावे सादर करण्यात आले. भारत भगत व सिद्दीकी यांनी सरकारतर्फे बाजू मांडली. कोर्टाकडून सक्षम पुराव्याच्या आधारावर आरोपी आकाश कृष्णा झाडखंडे याला शिक्षा ठोठावण्यात आली. तो पूर्वीच तुरुंगात असल्यामुळे सुनावण्यात आलेली शिक्षा त्यातून वजा करण्याचा निर्णय २६ फेब्रुवारी रोजी देण्यात आला.
----