शिक्षण, बांधकाम सभापती सुरेश निमकर बिनविरोध
अमरावती : जिल्हा परिषदेच्या शिक्षण व बांधकाम विषय समिती सभापती पदासाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे सदस्य सुरेश निमकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम सभापती प्रियंका दगडकर यांचे गत १८ जानेवारी रोजी निधन झाले. त्यामुळे विषय समिती क्र. ३ चे पद १९ जानेवारीपासून रिक्त होते. परिणामी या रिक्त असलेल्या सभापती पदासाठी जिल्हाधिकारी यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार २० मार्च रोजी अमरावतीचे एसडीओ तथा एसडीओ तथा निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंग राजपूत यांच्या उपस्थित घेण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेत सभापती पदासाठी काँग्रेस पक्षाचे धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर सर्कलचे सदस्य सुरेश निमकर यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. तीन अर्ज दाखल केले होते. यावर माजी अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर आदी सुचक म्हणून होते. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळेत प्राप्त अर्जाच्या छाननी करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष सभेचे कामकाज दुपारी ३ वाजता सुरू झाले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अर्ज मागे घेण्यासाठी दिलेल्या मुदतीत कुणीही अर्ज मागे घेतला नाही. एकमेव अर्ज असल्याने सुरेश निमकर यांची विषय समिती क्र ३ सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात येत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. निवडणुकीचे कामकाज डेप्युटी सीईओ डॉ. विजय राहाटे, नायब तहसीलदार प्रवीण देशमुख, प्रमोद देशमुख, विजय शेलुकर आदींनी केले. यावेळी झेडपीचे अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती दयाराम काळे, बाळासाहेब हिंगणीकर यांच्यासह सभागृहात झेडपीच्या ५९ सदस्यांपैकी ३४ सदस्य आणि ४ पंचायत समितीचे सभापती आदींची सभेला उपस्थिती होती.
बॉक्स
अध्यक्षांच्या बंगल्यावर व्यूहरचना
झेडपीच्या शिक्षण व बांधकाम सभापतीपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसच्या नेत्या तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर, झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे आदी नेत्यांनी सभापती पदासाठी सुरेश निमकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. अध्यक्षांच्या बंगल्यावर सकाळपासून घडलेल्या राजकीय घडामोडीत सुरू होत्या. यावेळी शिवेसना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे, राष्ट्रवादीचे राजाभाऊ कुकडे, राजेद्र बहुरूपी आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे भाजप काही सदस्यांनी तेथे हजेरी लावली होती.
बॉक्स
खातेवाटप जाहीर
जिल्हा परिषदेच्या शिक्षण व बांधकाम सभापती पदी बिनविरोध निवड झाल्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत नवनिर्वाचित सभापती सुरेश निमकर यांना खातेवाटप करण्याबाबत शासन निर्णय नुसार प्रक्रिया पार पडली.यावेळी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी निमकर यांचेकडे शिक्षण व बांधकाम समितीची जबाबदारी सोपविण्यात येत असल्याचा सभेत ठराव मांडला. या प्रस्तावाला सभापती दयाराम काळे यांनी अनुमोदन दिले. उपस्थित सदस्यांनीही बाके वाजून सहमती दर्शविली.
बॉक्स
भाजप प्रहार कडून अर्ज नाही
जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदासाठी शनिवारी पार पडलेल्या निवडणुकीत विरोधी पक्ष असलेल्या भाजप व प्रहार या पक्षाकडून एकाही सदस्यांनी नामनिर्देशपत्र दाखल केले नाही. त्यामुळे सर्वत्र राजकीय चर्चा रंगत होती. भाजप मधील सदस्यांना अर्ज भरण्यास विचारले असता कुणीही अर्ज दाखल करण्यास पुढे आले नाही, असे भाजपचे गटनेता प्रवीण तायडे यांनी सांगितले.