अमरावती : महापालिका क्षेत्रात पाचही झोनमधील ‘हॉटस्पॉट’मध्ये कोरोना अँटिजेन चाचण्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी रविवारी काही कँपला भेटी देऊन उपस्थितांशी संवाद साधला.
प्रत्येक झोनमधील चार ते पाच नगर हे कोरोना संसर्गाचे ‘हाॅटस्पॉट’झालेले आहे व या पॉकेटमध्ये जास्तीत जास्त कोरोना चाचण्या होऊन संक्रमित निष्पन्न व्हावेत व त्यांच्यावर उपचार होऊन कोरोनाची साखळी खंडित व्हावी, हा त्यामागील उद्देश आहे. या अनुषंगाने अर्जुननगर, रविनगर, रुक्मिणीनगर, जुना कॉटन मार्केट, भाजीबाजार, राधानगर, शंकरनगर, कॅम्प कलोतीनगर, राठीनगर, नवीवस्ती बडनेरा, खापर्डे बगीचा, वडाळी, कठोरा नाका, राजापेठ, जुनीवस्ती बडनेरा, अंबिकानगर व दस्तूरनगर, गाडगेनगर, गोपालनगर, साईनगर व काँग्रेसनगरमध्ये ही मोहीम राबविली जात आहे.
येथीळ बाजार समितीमध्ये रविवारी आयुक्त रोडे यांनी भेट दिली. या केंद्रावर ७५ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. यामध्ये एक जण पॉझिटिव्ह रुग्ण निघाला. याशिवाय भाजीबाजार येथे ईलेक्ट्रीकल व ईलेक्ट्रानिक्स असोसिएशनच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. उपायुक्त सुरेश पाटील, एमओएच डॉ विशाल काळे, सहाय्यक आयुक्त तिखिले, बाजार परवाना यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.