प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकाराची गरजलक्षवेध: वाहतुकीचा तिढा सोडविणे आवश्यक अमरावती : महापालिकेच्या हद्दीतील अंबिकानगर प्रभाग क्र.२० संमिश्र लोकवस्तीचा प्रभाग म्हणून ओळखला जातो. मात्र या प्रभागातील राजापेठ येथील रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न कित्येक महिन्यांपासून रखडला आहे. या ठिकाणीच परिसरातील नागरिकांना दैनंदिन व्यवहार, कामानिमित्त नेहमीच या ठिकाणाहून ये-जा करावी लागते. अशातच रेल्वे गेटजवळच भाजीबाजार भरत असल्याने या ठिकाणी भाजी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची वर्दळ बरीच असते. अशातच रेल्वे गाड्या येणाऱ्या आणि जाणाऱ्यामुळे गेट बंद झाले की या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होते. अशातच भाजी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची वाहनेही याच ठिकाणी ठेवली जातात त्यामुळे ही गैरसोय दुर करण्यासाठी राजापेठ येथील उड्डाण पुलाचे काम त्वरित मार्गी लावणे आवश्यक आहे. सोबतच भाजीबाजार परिसरात महापालिकेने स्वतंत्र पार्कीग व्यवस्था करणे, प्रभागातील मागासवर्गीय वस्तीमधील नागरिकांची गैरसोय दुर करण्यासाठी सार्वजनिक शौचालय बांधणे अत्यंत गरजेचे आहे. या सोबतच प्रभागातील अपूर्ण असलेली भुयारी गटार योजना पूर्ण करून सुरू करणे, जेणेकरून प्रभागातील सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न सुटू शकतो. या प्रश्नासाठी प्रभागाचे नगरसेवक महापालिका प्रशासन व शासन याच्याकडे नेहमीच पाठपुरावा करीत आहेत. मात्र ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत, त्या सोडविण्याचे दृष्टीने महापालिका प्रशासन आणि राज्य शासन यांच्या सहकाऱ्यातून पुढाकार घेण्याची गरज आहे, यासाठी नगरसेवक आग्रही आहेत.
उड्डाण पूल होईना वाहतूक कोंडी सुटेना
By admin | Updated: July 4, 2015 00:55 IST