अमरावती : कोरोना संक्रमितांची संख्या दरदिवशी वाढतच आहे. शुक्रवारी ३६९ पॉझिटिव्ह आढळून आले, तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत मृत्यूसंख्या ४३१ झाली आहे. कोरोनाने गत तीन दिवसांत पाच रुग्णांचा बळी घेतला आहे.
नवीन वर्षात जानेवारीपासून कोरोना बाधितांची आकडेवारी कमी होण्याचे नाव घेत नाही. १० ते १२ फेब्रुवारी या तीन दिवसांत पाच रुग्ण उपचारादरम्यान दगावल्याने चिंता वाढली आहे. १ ते १२ फेब्रुवारी यादरम्यान १२ दिवसांत २७०३ कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहे. मार्चपासून आतापर्यंत २४ हजार ५१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. शुक्रवारी तीन रूग्ण मृतांमध्ये तिवसा येथील ७४ वर्षीय पुरुष, शिराळा येथील ५० वर्षीय पुरुष आणि अकोला मार्गावरील स्नेहगंधा कॉलनी येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा प्रशासन आणि महापालिका कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करीत असताना कोरोनाचा कहर वाढत आहे. संक्रमित रुग्णांच्या उपचाराकरिता शहर, ग्रामीणमध्ये खासगी, शासकीय असे एकूण १० रुग्णालये कार्यरत आहेत.