मोर्शी : सेवानिवृत्त कर्मचारी आणि खोटया लाभार्थ्याच्या नावे बनावट कागदपत्र तयार करुन जवळपास एक कोटी सात लक्ष रुपयाचा शासनाला चुना लावणाऱ्या पंचायत समिती आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या एकूण पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुध्द मोर्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे येथे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. हेमराज भटकर कनिष्ठ सहायक एकात्मिक बालविकास प्रकल्प मोर्शी, फरीद शहा बाबा शहा, सहायक लेखाधिकारी पंचायत समिती मोर्शी, सध्या पंचायत समिती चांदूर बाजार येथे सहायक गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत तत्कालिन येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी जयंत बाबरे, तत्कालिन गट शिक्षणाधिकारी रवींद्र खपली आणि प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी रेखा वानखडे यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. कोट्यवधी रुपयाच्या या गुन्ह्याची कुणकुण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल भंडारी यांना लागताच त्यांनी २२ डिसेंबर २०१४ रोजी येथील पंचायत समिती कार्यालयास आकस्मिक भेट दिली. सेवानिवृत्त पर्यवेक्षिका आशा काळे यांचे अर्जित रजा रोखीकरण देयक ३ लक्ष ७६ हजार २०० रुपयाचे नियमबाह्य व बनावट आदेशाव्दारे काढल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर चौकशीनंतर त्यांनी सहायक लेखा अधिकारी शहा व कनिष्ठ सहायक हेमराज भटकर यांना या प्रकरणी दोषी ठरवून या दोघांविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करुन दोघांनाही निलंबित करण्यात आले. दरम्यान, बनावट आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक तर या पूर्वी झाली नाही ना या शंकेपोटी मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल भंडारी यांनी २००८ पासूनच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने एस. पी. बोडखे वरिष्ठ लेखा अधिकारी यांच्यासह इतर तीन अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. या चौकशी समितीने सखोल चौकशी करुन अहवाल मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद यांना सादर केला. चौकशी समितीने एकूण १ कोटी ६ लक्ष ९४ हजार रुपयाचा अपहार झाल्याचे नमूद केले आणि या रकमेच्या अपहार प्रकरणामध्ये जयंत बाबरे तत्कालीन बाल विकास प्रकल्प अधिकारी, एफ बी शहा सहायक लेखा अधिकारी पं.स. मोर्शी, रवींद्र खपली, तत्कालिन गट शिक्षणाधिकारी, श्रीमती रेखा न वानखडे पर्यवेक्षिका तथा प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी मोर्शी आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे कनिष्ठ सहायक हेमराज भटकर यांचा सरळ संबंध असल्याचे निष्कर्ष काढले. यापैकी एका आरोपीने बनावट देयके तयार करुन, बनावट स्वाक्षऱ्या आणि बनावट आदेश, दुबार देयक सादर करुन काढलेली रक्कम स्वत:च्या खात्यात जमा करुन शासनाला कोटयावधी रुपयाचा चुना लावल्याचा चौकशी समितीने दावा केला. या चौकशी अहवालाच्या अनुषंगाने येथील खंड विकास अधिकारी दिलीप मानकर यांनी येथील पोलीस ठाण्यात आरोपींविरुध्द तक्रार दाखल केली. त्यानुसार मोर्शी पोलिसांनी भादंवी च्या कलम ४६५, ४६८, ४७१, ४०९, ४२० (३४) अन्वये आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पालांडे हे या प्रकरणी तपास करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
पाच अधिकाऱ्यांनी लावला एक कोटीचा चुना
By admin | Updated: February 11, 2015 00:21 IST