पान २ चे लिड
श्यामकांत पाण्डेय
धारणी : जानेवारीच्या १५ तारखेला मेळघाटातील ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान होऊ घातले आहे. त्या प्रक्रियेदरम्यान उमेदवारी अर्ज भरणे व छाननीदेखील पार पडली. मात्र, त्यादरम्यान निवडणुकीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सहभागी झालेल्यांपैकी तब्बल ३५ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने यंत्रणेसोबतच मतदारांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग काळात होणारी ही पहिली सार्वत्रिक निवडणूक विनासायास पार पाडणे, प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.
मार्च २०२० मध्ये कोरोनाने संपूर्ण जगावर आघात केल्यानंतर आता कुठे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शासनाने सावधानता बाळगत अत्यंत विचारपूर्वक सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत न करता नागरिकांना दिलासा देण्याच्या प्रयत्न चालविला आहे. अशातच कोरोना काळात मेळघाटात ग्रामपंचायतींचे निवडणूक होऊ घातली आहे. धारणी तालुक्यात ३५ व चिखलदरा तालुक्यात २३ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होईल. त्यापार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी-कर्मचारी, उमेदवार उमेदवार प्रतिनिधी या सर्वांची कोरोना चाचणी केल्यानंतरच पुढील प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र पहिल्या टप्प्यात ३०० लोकाच्या कोरोना तपासणीनंतर त्यातील ३५ जण पॉझिटिव्ह आढळल्यामुळे कोरोनाची भयावहता कमी झाली नाही असे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत निवडणूक घेणे प्रशासनासाठी अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहे. तहसील आवारातच कोरोनाची चाचणी सुविधा उपलब्ध करवून देण्यात आली आहे.
बॉक्स
उमेदवार, कार्यकर्त्यांची गर्दी, मास्कला फाटा
कोरोनाची तिसरी फेरी अत्यंत घातक स्वरुपाची असल्याचे भाकित वा अंदाज आरोग्य यंत्रणेकडून वर्तविली गेली. त्यामुळे त्यावर प्रतिबंधात्मक उपाय आणि शासनाकडून मिळालेल्या निर्देशांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. मात्र, सध्यातरी ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापासून कोरोना तपासणी करण्यापर्यंत कुठेही सामाजिक अंतर आणि तोंडावर मास्क लावलेले दिसले नाही. त्यामुळे या निवडणुकीनंतर कोरोनाचा स्फोट होऊ नये, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अतुल पाटोळे, अपिलीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी ही मंडळी लक्ष ठेवून आहे. मात्र कोरोना टाळण्यासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.
-------------------