धामणगाव रेल्वे : यवतमाळ जिल्ह्याचे प्रवेशव्दार म्हणजे धामणगाव शहर. या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा़, येथील रस्ते व्हावेत़ प्रत्येक बेरोजगाराला रोजगार मिळावा, यासाठी नेहमीच तळमळीने कार्यकर्त्यांची विचारपूस करून अनेकांना रोजगार दिला़ इतकेच नव्हे तर धामणगाव शहरातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा रेल्वे फाटक ते नगरपरिषदेपर्यंतचा पहिला सिमेंट रस्ता सन १९६५ मध्ये ‘लोकमत’चे संस्थापक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या देखरेखीखाली बनला होता़ आजही या रस्त्याच्या रूपाने येथे त्यांच्या स्मृती तेवत आहेत. यवतमाळहून मुंबई येथे जाण्यासाठी मुंबई-नागपूर रेल्वे मार्गावर धामणगाव रेल्वे स्थानक आहे़ यवतमाळ जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून आजही धामणगाव शहराची ओळख आहे़ ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा त्याकाळी धामणगाव रेल्वे स्थानकावरून जात होते़ या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, हे त्यांचे स्वप्न होते़ स्व. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना धामणगाव येथील शिष्टमंडळ घेऊन त्यांनी स्वत: नाईक यांना भेटून तालुक्याची मागणी केली होती़ धामणगाव परिसरात काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी बाबुजींचा मोलाचा वाटा आहे़ मुंबईला जाताना प्रत्येक कार्यकर्त्यांशी जवळीक साधून त्यांचा विविध समस्यांचे निराकरण ते करीत असत. सन १९६५ मध्ये रेल्वे फाटक ते नगर परिषदेपर्यंतचा मुख्य सिमेंट रस्ता बाबूजींनी स्वत: राज्य शासनाकडून मंजूर करून आणला़ दिवसभर या रस्त्यावर वर्दळ असल्याने रात्रीला यवतमाळ येथून येऊन स्वत:च्या देखरेखीखाली रस्त्याचे काम करून घेतले़ आजही तो रस्ता मजबूत आहे़ परिसराच्या विकासासाठी येथील एखाद्या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवावे, अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्याकाळी आमदार स्व़ अण्णासाहेब देशमुख हे बाबुजींच्या नेतृत्त्वात आणि व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या परिश्रमाच्या बळावर विधानसभेत पोहोचले होते़तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत विदर्भातून एकमेव जवाहरलाल दर्डा हेच होते़ धामणगाव परिसरात त्यांनी काँग्रेस पक्षाशी वेळोवेळी बांधणी करून पक्ष मजबूत केला़ चांदूूर तालुका काँग्रेस कमिटीचे तत्कालीन अध्यक्ष नरेन्द्र देशमुख यांना अनेक वेळा मोलाचे मार्गदर्शन केले़ धामणगाव शहरातील शैक्षणिक संस्था असो वा गौरक्षण संस्था अथवा जवाहर सहकारी सूत गिरणीसाठी त्यांनी सहकार्य केले होते़ विद्युतमंत्री असताना धामणगाव शहरातील अनेक बेरोजगांराना बाबूजींनी रोजगार उपलब्ध करून दिला होता़ बाबुजींसोबत त्याकाळी हनुमानप्रसाद शर्मा़, बबनबाबू कनोजीया, जसराज मुंधडा, लक्ष्मीनारायण अग्रवाल, माजी नगराध्यक्ष अलसीदास राठी, नथमल कांकरीया, रामचंद्र चौबे, नरेन्द्र देशमुख, प्रदीप लुणावत हे ज्येष्ठ नेते राहायचे़ यवतमाळ जिल्ह्याचे प्रवेशव्दार असलेल्या धामणगावातून यवतमाळला जाण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असलेला नांदुरा पूल विजय दर्डा यांच्या मुळेच झाला आहे़
१९६५ मध्ये धामणगावात साकारला पहिला सिमेंट रस्ता
By admin | Updated: October 17, 2015 00:12 IST