फोटो पी ०५ परतवाडा आग
परतवाडा : येथील ट्रामा केयर युनिट व कोविड सेंटर परिसरामागे असलेल्या झाडाझुडपांना सोमवारी सकाळी ११.३० वाजता अचानक आग लागली. आगीने उग्र रूप घेण्यापूर्वीच अग्निशमन दल पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. येथील ट्रामा केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलेल्या ऑक्सिजन सिलिंडरपर्यंत ही आग पोहोचण्यापूर्वीच आटोक्यात आली.
अचलपूर तालुक्यातील कोविड केअर सेंटर व ट्रामा केअर युनिटमागे मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल आहेत. सोमवारी अचानक लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले. त्याच परिसरात रहिवासी असलेले आदिवासी पर्यावरण संघटनेचे योगेश खानजोडे, संजय डोंगरे यांनी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन अधिकारी संदेश जोगदंड, अनंत चौरसिया, फायरमॅन उद्धव पुरी, दीपक डोईफोडे, देवराव वानखडे आदींनी ही आग आटोक्यात आणली.
बॉक्स
मोठा अनर्थ टळला
ट्रामा केअर युनिटमध्ये व बाजूला असलेल्या कुटीर रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये जवळपास ३८ रुग्ण उपचार घेत आहेत. तेथे रुग्णांसाठी ऑक्सिजनचे २० सिलिंडर ठेवण्यात आले आहेत. आगीचे रौद्र रूप पाहता, अग्निशमन दलाने विलंब केला असता, तर मोठ्या प्रमाणात अप्रिय घटना घडली असती. मात्र, हा अनर्थ टळला.
बॉक्स
झुडुपात गांजा सेवनासाठी टोळके
कुटीर रूग्णालय व राजा शिवाजी विद्यालय या परिसरातील झुडुपी जंगलात गांजा सेवन करणाऱ्यांचे टोळके तो चिलमेत भरून पित बसलेले असतात. त्यातूनच उडालेल्या ठिणगीतून वाळलेल्या झाडांचा पालापाचोळा व कचरा जळत आग धुमसत ट्रामा केअर युनिट सेंटरच्या आवारापर्यंत गेल्याची चर्चा परिसरात होती.
कोट
कुटीर रुग्णालय व ट्रामा केअर युनिटमध्ये ३८ रुग्ण उपचार घेत आहेत. मागील परिसरात झुडुपे असल्याने वाळलेल्या कचऱ्याला आग लागली होती. मात्र, लवकर आटोक्यात आली.
डॉ. मोहम्मद जाकीर, कोविड सेंटर, अचलपूर