गुडेवार मंत्रालयात : हेमंत पवार महापालिकेचे नवे आयुक्तअमरावती : येणार-येणार म्हणून सर्वांच्याच नजरा ज्या आदेशाकडे लागल्या होत्या, तो आदेश सोमवारी दुपारी महापालिकेत धडकला आणि गुडेवारांच्या बदलीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. अपर जिल्हाधिकारी संवर्गातील हेमंत पवार यांची अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी नगरविकास विभागाचे उपसचिव ज.ना.पाटील यांच्या स्वाक्षरीने हे आदेश काढण्यात आलेत. महाराष्ट्र विकास सेवेतील चंद्रकांत गुडेवार यांना त्यांच्या ग्रामविकास व जलसंधारण या मूळ विभागाकडे परत पाठविण्यात आले आहे. ते मंत्रालयात पदस्थापित होतील. नगरविकास मंत्रालयात अवरसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. गुडेवार यांनी १६ मे रोजी महानगरपालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवून तत्काळ कार्यमुक्त व्हावे, असे आदेशात नमूद आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा आदेश अपलोड करण्यात आला आहे. याखेरिज महानगरपालिका कार्यालयातही आदेशाची प्रत पाठविण्यात आल्याने १२ मे पासून सुरु असलेल्या चर्चेला विराम लागला आहे. उल्लेखनीय म्हणजे, १२ मे रोजीच गुडेवार यांची वाशीम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाल्याची माहिती मंत्रालयस्तरावरून हाती आली होती. वाशीम येथे बदली झाल्याची माहिती गुडेवार यांनी महापौरांना दिली होती. त्यांची बदली रद्द होण्यासाठी स्वाक्षरी अभियानासह शहर बंदही पुकारण्यात आला होता. तसेच सोमवारच्या आमसभेत गुडेवारांंना संपूर्ण तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी अमरावतीत ठेवावे, असा ठराव होणे अपेक्षित होते, तसे होऊ शकले नाही.पवार आज पदभार स्वीकारणार४नवनियुक्त महापालिका आयुक्त हेमंत पवार मंगळवारी दुपारी पदभार स्वीकारणार आहेत. अमरावती शहर आणि जिल्हा आपल्यासाठी नवीन नाही. महापालिका आयुक्त म्हणून अंबानगरीत काम करणे आवडेल. सर्वसमावेशक कामांवर भर देणार असल्याची प्रतिक्रिया पवार यांनी 'लोकमत'ला दिली. सन २००७ ते २००९ या काळात हेमंत पवार अमरावतीचे अप्पर जिल्हाधिकारी होते. या काळात त्यांनी गॅस रिफिलिंगसह अन्य अवैध व्यवसायांवर वचक बसविला होता.
अखेर बदलीचा आदेश धडकला
By admin | Updated: May 17, 2016 00:02 IST