पान ३
पुसला : वरूड तालुक्यातील १७ सदस्यीय पुसला ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण संवर्गासाठी राखीव झाले आहे. मात्र, निवडणुकीत कोणत्याही गटाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सरपंचपदाकरिता दावेदारी सुरू झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी बहुमतात नसल्याने सरपंचपदाकरिता चढाओढ सुरू झाली आहे. भाजपला सोबत घेऊन सरपंचपद खेचून आणण्याची खेळी नाकारता येत नाही.
पुसला ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस गटाचे आठ, राष्ट्रवादीचे सहा व भाजप गटाचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे कोणत्याच गटाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सरपंच कोणत्या गटाचा बसेल, हे एक कोडेच आहे. त्यातच सर्वसाधारण आरक्षण घोषित झाल्याचे सरपंचपदाकरिता अनेकांनी दावेदारी केली आहे. काँग्रेस गटाला सत्ता प्रस्थापित करण्याकरिता एका सदस्याची गरज आहे, तर राष्ट्रवादी गटाला सत्तेसाठी तीन सदस्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी राजकीय खेळीबाबत मसलते सुरू आहेत. पण, काँग्रेस राष्ट्रवादी समर्थित पॅनेलने सरपंच पद खेचून आणण्याची जोरदार तयारी चालविली आहे.