अमरावती : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आदेशानुसार राज्यात काही जिल्ह्यांमध्ये १५ फेब्रुवारीपासून अकृषी विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालये सुरू झाली. परंतु, आता कोरोना संसर्ग व संक्रमितांची मृत्युसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा महाविद्यालये बंद करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. बुधवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या मुद्द्यावर महाविद्यालयांचा आढावा घेतला, हे विशेष.
अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वंयअर्थसाहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि, पश्चिम विदर्भात अमरावती विभाग याला अपवाद ठरला आहे. कोरोना नियमांचे पालन करून महाविद्यालये सुरु करावेत, अशा सूचना शासनाने दिल्या होत्या. त्याअनुषंगाने महाविद्यालयांच्या संस्थाचालकांनी तयारी आरंभली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सूचनांप्रमाणे अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ येथील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाईन परीक्षा अर्ज स्वीकारण्यात येत होते. एवढेच नव्हे तर ऑनलाईन नामांकन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोना संक्रमणाचा विस्फोट झाला. परिणामी अमरावती जिल्ह्यात महाविद्यालये सुरू करण्यास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी परवानगी नाकारली व तसे कुलगुरूंना कळविले. आता नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद सोलापूर, कोल्हापूर, नागपूर जिल्ह्यांमध्येही कोरोनाचे लोण पसरत चालले आहे. पुणे येथील उच्च व तंत्र शिक्षण संचालकांनी विद्यापीठांतून हिवाळी-२०२० ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षांची माहिती मागविली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात महाविद्यालये बंद होतील, असे संकेत मिळू लागले आहे.
कोट
जिल्हा प्रशासनाने कोरोनाची स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन महाविद्यालये सुरू ठेवावे अथवा नाही, याबाबत निर्णय घ्यायचा आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या महाविद्यालये सुरू करण्याबाबतच्या आदेशात ही बाब स्पष्ट नमूद आहे.
-धनराज माने, संचालक. उच्च व तंत्र शिक्षण महाराष्ट्र