अमरावती : आजोबा वनविभागात, नातवाने गाठले आयएएसवडील ऑटोरिक्षाचालक, नाही म्हणायला ते अलीकडे कारचालक झाले होते. पण, सुविधेचा अभाव असलेल्या मेळघाटातून शिकून आयएएस झालेल्या शिवांग तिवारीला जे प्रेरणास्थान ठरले, ती कुटुंबातील एकमेव व्यक्ती म्हणजे आजोबा, जे वनविभागात नोकरीला होते. शिवांगने मात्र थेट आयएएस या सर्वोच्च पदाला गवसणी घातली. शिवांगने पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण कुसुमकोट येथील जिल्हा परिषद शाळा घेतले, तर आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण हरिसाल येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्याच्या वडिलांनी मुलांसाठी शिक्षणाच्या संधी चाचपण्यासाठी यानंतर अमरावती गाठले. हरिसाल येथील रहिवासी असल्याने. मला आदिवासी वस्ती-पाड्यातील समस्या, प्रश्नांची जाण आहे. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अधिकारी होण्यासाठी तयारी केली गेली नि आज यशस्वी झालो, असे त्याचे म्हणणे होते.
सेल्फ स्टडीने दिले बळ, 'सारथी'ने आत्मविश्वासवरूड : यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्ली गाठण्याची तळमळ असली तरी तेथे जाण्याची, राहण्याची व्यवस्था करण्याची आर्थिक क्षमता शेतकरी असलेल्या वडिलांची नव्हती. पण, पाठबळ पुरेपूर होते. त्यामुळे नम्रता ठाकरे यांनी सुरुवातीला सेल्फ स्टडी सुरू केली. यादरम्यान त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या 'सारथी' संस्थेमार्फत झालेली परीक्षा उत्तीर्ण करून शिष्यवृत्ती प्राप्त केली आणि तयारीसाठी दिल्ली गाठले. एक वर्ष तयारी केल्यानंतर पुन्हा नागपूरला येत प्रयत्न चालविले. आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी या काळात त्यांनी खासगी कोचिंग वर्गामध्ये शिकविणे सुरू केले, जे अद्यापही सुरू आहे. मजल दर मजल करीत नम्रता यांनी २०२४ ला झालेल्या परीक्षेत सातव्या प्रयत्नात अखेर यशाला गवसणी घातलीच, नम्रता यांचा युपीएससीमध्ये ६७१ वा रैंक आहे. याप्रमाणे आयपीएस किंवा आयआरएस मिळेल, असा विश्वास त्यांना आहे.
आईच्या अपघाताने कोलमडला, पण तिनेच दिला धीरधामणगाव रेल्वे : मुळातच हुशार असलेल्या रजत श्रीराम पत्रे याचे उद्दिष्ट ठरले होते. दहावीपर्यंत रजतचे शिक्षण धामणगाव येथील सेफला हायस्कूल येथे झाले. पुढील शिक्षणासाठी त्याने पुण्याचे फग्र्युसन कॉलेज गाठले आणि तेथेच त्याच्या जीवनाला दिशा मिळाली. समाजसेवक असलेल्या वडिलांचा मान प्रशासकीय सेवेत जाऊन आणखी उंचवायचा, हेच आधीपासून त्याने मनाशी ठरविलेले. मात्र, नियतीने परीक्षा पाहिली. अपघातात आईची अवस्था पाहून तो सैरभैर झाला. त्याचे लक्ष ध्येयापासून विचलित होत आहे, हे त्या माऊलीला जाणवताच अपघाताची पर्वा न करता अंतिम ध्येय गाठण्यासाठी त्यांनीच रजतला प्रवृत्त केले. त्याच्या बळावर धामणगाव रेल्वे तालुक्यातील पहिला आयएएस अधिकारी होण्याचा बहुमान त्याने मिळविला. अर्थात अध्यात्माचा दांडगा अभ्यास, वक्ते असलेले वडील श्रीराम पत्रे यांनीही त्याला तोलामोलाची साथ दिली