अध्यक्षांची मनमानी : पात्र शेतकऱ्यांना कर्ज नाकारल्याचा आरोपतिवसा : जिल्हा सहकारी बँकेद्वारा तालुक्यातील तीन सोसायटीच्या शेतकरी सभासदांना कर्ज नाकारण्यात आले. बँकेचे अध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरोधात याच बँकेचे संचालक सुरेश साबळे यांनी शेतकऱ्यांसमवेत शाखा कार्यालयासमोर गुरुवारपासून उपोषण सुरू केले आहे. तालुक्यामधील सातरगाव, शेंदूरजना बाजार व वरुडा या तीन सेवा सहकारी सोसायटीच्या शेतकरी सभासदांना जिल्हा बँकेचे अध्यक्ष बबलू शेखावत यांनी हेतूपुरस्सर पीक कर्ज वाटप नाकारले असल्याचा सुरेश साबळे यांचा आरोप आहे. वारंवार पत्र देऊन, पाठपुरावा करूनही अध्यक्षांनी कर्ज नाकारल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी पडीत राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची बँक असणाऱ्या जिल्हा बँकेने आॅगस्ट २०१२ मध्ये शेतकऱ्यांना थेट कर्ज वाटप न करता गावांमधील सेवा सहकारी सोसायटीद्वारा कर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. व बँकेच्या या धोरणात्मक निर्णयाविरोधात विद्यमान अध्यक्ष बबलू देशमुख यांनी काभार चालविला आहे व काही शेतकऱ्यांना सोसायटींना डावलून थेट कर्ज देण्यात येत असल्याचा आरोप साबळे यांनी केला व अध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरोधात उपोषण आरंभले आहे. त्यांच्यासमवेत कृउबासचे अध्यक्ष रामराव तांबेकर, सातरगाव सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष कमलाकर वाघ, शेंदूरजना बाजार सोसायटीचे उपाध्यक्ष किशोर चौधरी, खरेदी विक्री संघाचे संचालक नंदकुमार गोहत्रे, सालोऱ्याचे सरपंच राजकुमार इंगळे, दापोरीचे उपसरपंच रवी राऊत, शेतकरी सभासद माधव मते, कुंजा किसन बोकडे, डोमा दौलत बोकडे, सुरेश वाढोणकर, देवीदास गोहत्रे, दिगंबर खरासे आदी सहभागी झाले. माजी आ. भैयासाहेब ठाकूर यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन बँक अध्यक्षांच्या शेतकरी विरोधी धोरणावर टिका केली. (प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांची दखल, विभागीय सहनिबंधकांना निर्देशजिल्हा बँकेद्वारा पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारता येत असल्याची बाब आ. यशोमती ठाकूर यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणली. यावर जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी विभागीयसह निबंधकांना पत्र देऊन शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज उपलब्ध करण्याचे निर्देश दिलेत. या अनुषंगाने विभागीय सहनिबंधकांनी गुरुवारी जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना पत्र देऊन या तिनही सोसायटीचे शेतकरी सभासद पीक कर्ज वाटपातून वंचित राहू नये, असे निर्देश दिले आहेत.
जिल्हा बँक संचालकांचे तिवसा शाखेसमोर उपोषण
By admin | Updated: July 8, 2016 00:16 IST