नेरपिंगळाई : स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनामुळे येथील नागरिक त्रस्त झाले असून तसेच ग्रामसचिवाच्या बेताल वागण्यामुळे अखेर येथील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरु केले आहे.महाराष्ट्र राज्य स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत २०.३१ रुपये खर्च करुन बांधलेले बाजार ओटे व काँक्रीट रस्ते विना परवाना तोडल्याने या प्रकरणाची चौकशी होऊन त्यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी झालेल्या ग्रामसभेत, सदस्यांनी सरपंचावर अविश्वास दाखवून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. सन २०११ ते १२ मध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेले घरकूल शासकीय जागेवर अतिक्रमण करुन ४५ ते ५० वर्षांपासून राहत असलेल्या लाभार्थ्यांना घरकुलाकरिता जागेचे पट्टे देण्यात यावे. ज्या नागरिकांचे बीपीएल यादीमध्ये नावे आहेत त्यांना नियमानुसार घरकूल देण्यात यावे, अशा मागण्यांसाठी राजेश कोंडवते, प्रल्हाद गेडाम, कमल धुर्वे, लखन वरखडे, प्यारेलाल शेलोकर, किसन टेकाम, पंजाब मोहोकर, फत्तू गायकवाड, दिलीप पांडे, किसन सोनोने, देवराव पांडे, मंदा सोनोने, चंद्रकला तुमसरे आदी नागरिक बेमुदत उपोषणावर ग्रामपंचायत समोर बसले आहेत. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या नागरिकांच्या या बेमुदत उपोषणाकडे ग्रामसचिव वाघ हे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. (वार्ताहर)
नेरपिंगळाई ग्रामपंचायतीच्या विरोधात उपोषण
By admin | Updated: February 7, 2015 23:17 IST