अमरावती : मंगळवारी रात्रीला आलेल्या वादळासह अवकाळी पावसाने रबीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. संत्र्याच्या आंबिया व मृग बहाराची फळे गळली. नांदगाव तालुक्यात काही ठिकाणी हरभऱ्याच्या आकाराची गारपीट झाली. अंजनगाव, पथ्रोट परिसरात केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त भागाचे तातडीने सर्व्हेक्षण करण्याची मागणी जोर धरत आहे. शेतकऱ्यांवर वारंवार नैसर्गिक आपत्तीचा मार बसत असल्याने जगावे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. नांदगाव तालुक्यात गारांसह पाऊसनांदगाव खंडेश्वर : तालुक्यात रात्री १ वाजताच्या सुमारास वादळी पावसासह बोराच्या आकाराच्या गारा पडल्याने संत्रा गहू, हरभरा, तूर, आंबा या पिकाचे नुकसान झाले. खंडाळा, पळसमंडळ, हंसराजपूर परिसरात वादळी पावसाचा तडाखा बसला. तुरीच्या गंज्याही भिजल्या. तालुक्यात ८८४ हेक्टर संत्रात संत्रा, ९७ हेक्टरमध्ये लिंबू व ४२०० हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी झाली. बुधवारी पळसमंडळचे सरपंच महेंद्र शेंडे, उपसरपंच नरेश ठाकरे, सर्फराज खान, नशीब खान, राजकुमार ठाकरे, भैया रोडे, किशोर ठाकरे, रणजित खडसे यांनी तहसीलदार, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे मदतीची मागणी केली.
शेतकरी संकटात, भरपाईची मागणी
By admin | Updated: February 12, 2015 00:18 IST