मोर्शी : मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीला पाच वर्षे पूर्ण झाल्याने शासनाने आपला प्रतिनिधी नियुक्त केला आहे. तसेच अप्रशासकीय १८ जणांचे मंडळ नियुक्त केले. हे मंडळ ३ डिसेंबरला नियुक्त केले. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यल्प दरात म्हणजे ५ रुपयात जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेचे उद्घाटन आ.अनिल बोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रशासक आप्पासाहेब गेडाम यांनी नियुक्त प्रशासक मंडळानी एकाच महिन्याच्या अवधीमध्ये काय केले त्यासंबंधी माहिती दिली. प्रशासक मंडळ नियुक्त झाल्याबरोबरच एक महिन्यात बाजार समितीचे उत्पन्न १० लक्ष रूपयांनी वाढले. शेतकऱ्यांकरिता राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी मोर्शी व लेहेगाव येथे पिण्याच्या पाण्याकरिता बोअर अशा अनेक बाबी करण्याचे ठरविण्यात आले. अगोदर बाजार समितीत हर्रास हा दुपारी ३ नंतर होत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री १ ते २ पर्यंत थांबावे लागत होते. परंतु बाजार समितीच्या निर्णयामुळे सचिव लिखितकर यांनी दखल घेऊन हा हर्रास सकाळी सुरू करून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन आ.बोंडे यांनी केले. या अगोदर अनेक राजकीय मंडळाने येथे सत्ता भोगली. पण, त्यांनी काहीच केलेले नसताना अशा अनेक लोकांना शेतकरी का निवडून देतात, असा सवालसुद्धा बोंडे यांनी केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद भुयार होते. प्रमुख अतिथी म्हणून नवनियुक्त डॉ.पंजाबराव देशमुख बँकेच्या डायरेक्टर प्राध्यापक अंजली ठाकरे उपस्थित होत्या. संचालन सचिव लिखितकर, आभार प्रदर्शन संजय घुलक्षे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना माफक दरात भोजन
By admin | Updated: January 9, 2016 00:29 IST