पोलिसांच्या जप्तीनंतर वाहनाने घेतला पेट : वरूड तालुक्यातील घोराड परिसरातील घटना वरुड : तालुक्यात कृषी साहित्यासह वायर चोरीच्या घटना नित्याच्या झाल्या असताना चोरटयांनी आता मोसंबी, संत्र्याकडे सुद्धा वक्रदृष्टी वळवली आहे. घोराड परिसरातून मोसंबी चोरुन नेत असताना एक वाहन शेतकऱ्यांनीच पकडून पोलिसांच्या हवाली केले. मात्र, जप्त करून हे वाहन पोलीस नेत असताना त्या वाहनाने अचानक पेट घेतला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. मंगळवारी मध्यरात्रीनंतर एका टाटा सुमो वाहनामध्ये चार पोते मोसंबी चोरून भरून नेताना आढळल्याने शेतकऱ्यांनीच चोरट्यावर हल्लाबोल केला. यामुळे घाबरलेल्या चोरटयांनी वाहन सोडून घटनास्थळावरून पोबारा केला. घटनेची माहिती वरूड पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून चारचाकी वाहन आणि दुचाकी जप्त केली. ही वाहने ठाण्यात आणत असताना चांदसनजीक चारचाकी वाहनाने अकस्मात पेट घेतला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनाला आग कशी लागली, हा प्रश्न परिसरात चर्चेचा झाला आहे.परिसरात मोसंबी आणि संत्रा चोरीच्या घटना वाढल्याने येथील काही शेतकरी शेतातच दबा धरून बसले होते. यावेळी चार पोते मोसंबी तोडून टाटा सुमो क्र. एम.एच १२ ए.एक्स. ५६५० मध्ये भरून नेले जात होते. यावेळी बाजुलाच दुचाकी क्र. एम.एच. २७ वाय. ४९१६ देखील उभी होती. ही बाब लक्षात येताच शेतकरी चोरट्यांवर धावून गेले. शेतकऱ्यांचा हल्लाबोल पाहून चोरट्यांनी वाहन तेथेच सोडून पोबारा केला. त्यानंतर शेतकऱ्यांनी टाटा सुमो नाल्यात उलटवून दिली होती. याबाबत वरूड पोलिसांना माहिती दिल्यानंतर ठाणेदार गोरख दिवे, बिट जमादार दिलीप वासनकर यांनी घटनास्थळ गाठून वाहन जप्त केले. फिर्यादी शेतकरी मनोहर रामाजी गाडबैल (रा.घोराड) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.जप्त केलेली वाहने ट्रॅक्टरच्या सहाय्याने वरूड पोलीस ठाण्यात आणत असताना अचानक चोरीमध्ये वापरलेल्या चारचाकी वाहनाने चांदस गावालगत पेट घेतला. चोरीतील वाहन पेटल्याने परिसरात चर्चेला उत आला असून ओढत आणत असलेले वाहन पेटले तरी कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार गोरख दिवे यांच्या मार्गदर्शनात जमादार दिलीप वासनकरसह वरूड पोलीस करीत आहे. (तालुका प्रतिनीधी)
शेतकऱ्यांनीच पकडून दिले मोसंबी चोरट्यांचे वाहन
By admin | Updated: November 3, 2016 00:12 IST