अमरावती : हवामानावर आधारित पीक विमा योजनेला हरभरा पिकासाठी १५ नोव्हेंबर व गहू पिकासाठी ३० नोव्हेबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यात रबीची केवळ ६ टक्केच पेरणी झाली असताना ३१ आॅक्टोबरला या योजनेची मुदत संपली होती. शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण कवच मिळावे यासाठी 'लोकमत'द्वारा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत हवामानावर आधारित पीक विमा योजना रबी हंगामातील हरभरा व गहू पिकासाठी जिल्ह्यात पथदर्शक स्वरुपात लागू करण्यात आली होती. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना हरभरा पिकासाठी ३१ आॅक्टोबर व गहू पिकासाठी २२ नोव्हेंबर ही 'डेडलाईन' देण्यात आली होती. परंतु जिल्ह्यात रबी पिकाची पेरणी केवळ ६ टक्केच झाली असल्याने उर्वरित शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अन्यायकारक होता. पीक पेरणीच झाली नसल्याने विमा कसा काढावा या संभ्रमात शेतकरी होता. त्याचवेळी कर्जदार सभासद शेतकऱ्यांसाठी ही योजना सक्तीची असल्याने त्यांच्या खात्यामधून पीक विमा हप्त्याची कपात करण्यात आली.पेरणीपूर्वीच कर्जकपात होत असल्याने शेतकऱ्यांच्या संतप्त भावना होत्या. या जनभावनेचा 'लोकमत'ने सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी शुक्रवारी रात्री उशिरा महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव शरद पावसकर यांनी हवामानावर आधारित रबी पीक विमा योजनेला मुदतवाढ दिल्याचे आदेश जारी केले आहे.
पीक विमा योजनेला अखेर मुदतवाढ
By admin | Updated: November 2, 2014 22:26 IST