धारणी : तालुक्यात जवळपास एक हजार घरकुलांचे काम युध्दस्तरावर सुरू आहे. या कामासाठी लागणाऱ्या गौणखनिजांचा काही ट्रॅक्टर मालक स्वयंघोषित कंत्राटदार बनून पुरवठा करीत आहेत. डब्बर व रेतीसह विटांचाही यात समावेश आहे. या तीनही सामग्रीच्या वाहतुकीसाठी रॉयल्टीची गरज असते. मात्र पुरवठादार हे राजकीय पक्षांचे पुढारी असल्याने त्यांनी जवळपासच्या नदी नाल्यांना लक्ष्य बनवून अवैधरित्या रेतीचा उपसा चालविला आहे. परिणामी नदी-नाल्यांना धोेका निर्माण झाला आहे. अवैधरित्या रेतीचा उपसा करण्यात येत असल्याने नदी-नाल्यांत खोलवर खोदकाम करण्यात आले आहे. नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र येथील अवैध कामकाजावरून दिसून येत आहे. या प्रकाराला गावपातळीवरील कोतवाल व तलाठ्यांचे अभय लाभत असल्याने तस्करांचे चांगलेच फावले आहे. त्याचप्रमाणे नदी-नाल्यांच्या पात्रातून दगड फोडून त्याचे डब्बरमध्ये रूपांतरण करून विना परवाना वाहतूक केली जात आहेत. घरकूल लाभार्थ्यांपर्यंत हा माल पोहोचविण्यात येत आहे. वास्तविक तालुक्यात एकच रेती पुरवठादार असून डब्बरचाही एकच अधिकृत परवानाधारक पुरवठादार आहे. या परवानाधारकांकडून आतापर्यंत रेती व डब्बरचे रॉयल्टी घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. अधिकृतरीत्या तालुक्यातील तापी नदी-पत्रातील केवळ सोनाबर्डी व मोथा या दोनच रेतीघाटांचे लिलाव झाले आहेत. तरीदेखील लिलाव न झालेल्या गडगा, सिपना, खंडू व खापरा नदीसह इतर लहान-मोठ्या नदी-नाल्यांच्या पात्रातून दररोज शेकडो ब्रास रेतीचा अवैध उपसा केला जात आहे. तसेच डब्बर व मुरमासाठी एकच परवानाधारक आहे. त्यांचे क्रशर व खदान हे शरहाला लागूनच असलेल्या नाक्याजवळ आहे. त्यांच्याकडूनही घरकुल लाभार्थ्यांनी डब्बर खरेदी केले नसल्याची माहिती आहे. तरीही प्रत्येक घरकूल लाभार्थ्याकडे तीन ते चार ब्रास डब्बर कोठून आले, हा संशोधनाचा विषय आहे. तालुक्यातील नदी-नाले सद्यस्थितीत तस्करांसाठी सोन्याच्या खाणी बनल्या आहेत. या माध्यमातून हे तस्कर मालामाल होत आहे. मात्र मोठ्या प्रमाणात गौण खनिजांचा अवैध उपसा होत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याकडे महसूल विभागाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
घरकुलांसाठी गौण खनिज उत्खनन
By admin | Updated: June 11, 2014 23:01 IST