ग्रामीण रुग्णालयाचा कारभार, रुग्णांमध्ये रोष
चांदूरबाजार : शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना रुग्णालयाबाहेर उघड्यावर उभे ठेवून वैद्यकीय तपासणी केली जात आहे. रुग्णांना लखलखत्या उन्हात उभे ठेवून डॉक्टर मात्र स्वत:च्या कक्षात बसून खिडकीतूनच रुग्णांची तपासणी करीत असल्याचा अफलातून कारभार सध्या ग्रामीण रुग्णालयात सुरू आहे. या प्रकारामुळे रुग्णांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
नागरिकांना अल्प दारात उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, या हेतूने ग्रामीण तसेच शहरी भागात शासकीय रुग्णालये उभारण्यात आली. या रुग्णालयातून दररोज शेकडो रुग्णांना उपचार देण्यात येतो. मात्र, शहरातील ग्रामीण रुग्णालयातील कारभार सातत्याने ढेपाळत चालला आहे. सध्या मार्च महिना सुरू असून उन्हाचे चटके चांगलेच जाणवू लागले आहे. अशात रुग्णालयात उपचाराकरिता आलेल्या रुग्णांना उन्हात ताटकळत उभे ठेवण्यात येते. या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आपल्या कक्षात बसून खिडकीतूनच रुग्णाची तपासणी करीत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून, शहरासह ग्रामीण भागातील अनेक रुग्ण उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात येतात. रुग्णालयात तपासणीच्या वेळेवरसुद्धा वैद्यकीय अधीक्षकांचा वचक नसून ग्रामीण रुग्णालयाला उतरती कळा लागल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे.
रुग्णांना एका रांगेत व एका पाठोपाठ एक उभे करून फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडविला जात आहे. या रुग्णालयाचा इमारतीजवळच कोविड रुग्णालय असून येथे तपासणी करण्यासाठी आलेल्या रुग्णांनासुद्धा निर्धारित वेळेवर नोंदणी तसेच तपासणी केली जात नसल्याचा आरोप समाजसेविका स्टेला यांनी केला आहे. त्या ठिकाणीसुद्धा शारीरिक अंतर ठेवण्याच्या नियमाचे कोणतेच पालन होत नसून रुग्णालयीन यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्यास वाव मिळत असल्याचे शक्यता नाकारता येत नाही. या सर्व प्रकाराविषयी वैद्यकीय अधीक्षक संध्या साळकर यांचाशी संपर्क साधला असता त्या उपलब्ध होऊ शकल्या नाही.