पान ३ सेकंड लिड
मोर्शी : तलाठी सुटीवर असल्यावरसुद्धा गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या अनुदानाची यादी बँकेत देण्यात आली. जवळच्या नागरिकांच्या खात्यात रक्कम यामुळे जमा करण्यात आली होती. या प्रकरणात घोळ असल्याबाबत वृत्त प्रकाशित झाले होते. यावर सारवासारव म्हणून तेवढीच रक्कम पुन्हा त्या खात्यात जमा करण्यात येऊन हे प्रकरण शांत करण्याचा प्रकार मोर्शी महसूल विभागाकडून केला जात आहे.
डिसेंबर २०१९ ते जानेवारी २०२० दरम्यान गारपीट व अवेळी पावसामुळे नुकसान झेलणाऱ्या १५ शेतकऱ्यांची यादी हिवरखेड या गावातील महाराष्ट्र बँकेत जमा करण्यात आली. या यादीतील शेतकऱ्यांच्या नावावर एकूण ४ लाख ९८ हजार ९६० रुपये धनादेशाद्वारे बँकेत जमा करण्यात आले आहेत. या हलक्यातील पटवाऱ्याला अपघात झाल्यामुळे ५ एप्रिल ते ८ जून २०२१ दरम्यान ते सुटीवर असल्यानंतरही लाभार्थी यादी तयार करण्यात आली. या यादीमध्ये शेतकरी नसलेल्या नागरिकांची नावे आहेत. याप्रकरणी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात तहसीलसंबंधी बोलले जात असून, साहेब पाहून घेतील, तुम्ही काळजी करू नका, असे संभाषण आहे. हे प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून ४ लाख ९८ हजार ९६० रुपये रोख पुन्हा जमा करण्यात आले आहेत. यामध्ये तलाठ्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या युवकाने ही रक्कम शेतकऱ्यांकडून जमा केल्याचे म्हटले आहे.
दुसरी यादी नजरचुकीने?
मौजा मायवाडी येथील गारपीट अनुदान वाटपाच्या वेळी याद्यांची झेरॉक्स काढताना चुकीची यादी नजरचुकीने जोडण्यात आली. त्यामुळे चुकीच्या यादीचा धनादेश बनविण्यात आला. ही चूक लक्षात येताच संबंधित शेतकऱ्यांना समजावून ४ लाख ९८ हजार ९६० रुपये पुन्हा खात्यात जमा करण्यात आली. सदर चूक अनवधानाने झाली आहे. त्याकरिता मी सर्वस्वी जबाबदार आहे, असे पत्र तलाठ्याच्या हाताखाली काम करणाऱ्या पांडुरंग गेडाम यांनी तहसीलदारांना दिले. ही रक्कम चलानद्वारे इन्डसइंड बँकेच्या अमरावती शाखेत जमा केलेली आहे.
------