आधी मिळायचे जिल्हा परिषदेमार्फत, आता संचालक कार्यालयाकडून वाटप
अमरावती : जिल्ह्यातील ज्येष्ठ कलावंत आणि साहित्यिक शासनाकडूनच उपेक्षितच आहेत. या कलावंतांना राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे तोकडे मानधन दिले जाते. मात्र, तेही दोन ते तीन महिने उशिराने मिळत आहे.
राज्य शासनाकडून दिले जाणारे हे मानधन डीबीटीव्दारे थेट कलावंतांच्या बँक खात्यात टाकले जातात. त्यात अ वर्ग ब वर्ग आणि क वर्ग करण्यात आले आहेत. अ वर्गात राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कारप्राप्त कलावंतांना मानधन दिले जाते. ब वर्गात राज्यस्तरावर आणि क वर्गात जिल्हास्तरावर सादरीकरण करणाऱ्या कलावंत आणि साहित्यिकांना हे अनुदान दिले जाते. मात्र, ही तुटपुंजी रक्कमदेखील वेळेत मिळत नाही. त्या रकमेत बहुतेक कलावंतांच्या महिनाभराचा कुटुंबांचा उदरनिर्वाह भागविण्यासोबतच औषधांचा खर्चदेखील भागू शकत नाही. त्यामुळे कलावंत शासनाच्या या धोरणावर नाखूश आहेत. ज्यांनी कलेच्या माध्यमातून राज्यात व जिल्हास्तरावर नावलौकिक मिळविले अशा कलावंतांना १५०० रुपये मानधन देऊन बोळवण न करता किमान वृध्द कलावंतांना दरमहा १५ ते ३५ हजार रुपये मानधन देण्याची अपेक्षा या वृद्ध कलावंतांनी व्यक्त केली आहे. दरवेळी उशिरा होणारे मानधनही नियमित मिळत नसल्याची खंतही या कलावंतांनी बोलून दाखविली. याची शासनाने दखल घेण्याची आज खरी गरज असल्याचे वृध्द कलावंतांची मागणी आहे.
बॉक्स
मानधन मिळणारे कलावंत साहित्यिक
जिल्ह्यातील कलावंत ७००
राष्ट्रीय कलावंत ०२
राज्यस्तरीय कलावंत १००
बॉक्स
मानधन किती रुपये प्रति माह
राष्ट्रीय पातळीवरील कलाकार २१०० रुपये
राज्य पातळीवरील कलाकार १८०० रुपये
जिल्हा पातळीवरील कलाकार १५०० रुपये
कोट
कलावंतांचे मानधन वेळेवर मिळत नाही. तीन महिन्यापासून अद्यापही पैसे मिळाले नाही. कुटुंबाचा रोजी रोटीचा प्रश्न यामुळे उभा राहिला आहे. जगण्या पुरते तरी पैसे मिळावे आणि ते वेळेवर मिळावे ही अपेक्षा आहे.
सुखदेव जामनिक
कलावंत निमखेड बाजार
कोट
सध्या दिले जाणारे कलावंताचे मानधन अत्यंत तुटपुंजे आहे. या अनुदानात शासनाने वाढवून द्यावी सध्या वाढती महागाई लक्षात घेता भरीव वाढ करून वृध्द कलावंतांना न्याय द्यावा व मानधनही वेळेवर द्यावे.
- राजाभाऊ हाताकडे,
राज्यस्तरीय कलावंत
कोट
लोककलेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कला महोत्सव उत्कृष्ट काम केले. गाडगेबाबाच्या जीवन दर्शनावर सुद्धा कार्य केले आहे. अशा ज्येष्ठ व वृध्द कलावंतांना १५०० रुपये मानधन देऊन शासन थट्टा करीत आहे. त्यामुळे किमान कलावंतांना १५ ते ३५ हजार रुपये मानधन द्यावे आणि तेही वेळेवर द्यावे.
- उत्तमराव भैसणे,
राज्यस्तरीय कलावंत