मोर्शी : वीज भारनियमन रद्द करा व पुरेशा दाबाचा वीजपुरवठा नियमित करण्याच्या मागणीसाठी संतप्त शेतकरी दिवाळीच्या पूर्वसंध्येला येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडकले. त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालून आपली मागणी रेटली. यावर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकरी आणि संत्रा बागाईतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या विपरीत परिस्थितीतही ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे आणि अप्पर वर्धा धरणातून ज्यांनी पाण्याची उचल केली अशा शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने आणि वेळापत्रकाप्रमाणे अखंडित विजेचा पुरवठा मागील पंधरवाड्यापासून होत नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात दोन वेळा राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी निवेदन देऊनही हा प्रश्न कायमच होता. त्यामुळे बुधवारी जवळपास २०० च्या वर संतप्त शेतकरी विदर्भ जनसंग्रामचे आप्पा गेडाम यांच्या नेतृत्वात राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता चौधरी यांच्या कार्यालयात धडकले आणि हा प्रश्न जोपर्यंत निकाली निघणार नाही तोपर्यंत कार्यालयातून हलणार नाही, अशी भूमिका घेतली होती. अखंडित आणि पुरेशा दाबाअभावी अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी आणि स्टार्टर जळाल्या. याप्रकरणी कार्यकारी अभियंता ना.तु. चौधरी, सहायक अभियंता खाटके यांनी मंगळवारी वरिष्ठांना विजेचा दाब वाढविण्याची विनंती केली. अधिकारी आणि त्यांची चमू १० टक्यांनी भारक्षमता वाढवून देणार असल्याचे, शिवाय संध्याकाळ पर्यंत हा प्रश्न निकाली निघण्याचे आश्वासन दिले. पाळा, सुपाळा, भाईपूर परिसरातील बंद पडलेल्या तीन डीबी बदलविण्यात आल्याचे आणि उर्वरित दोन डीबी तातडीने बदलवून देण्यात येणार असल्याचेही यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांची वीज कार्यालयावर धडक
By admin | Updated: October 22, 2014 23:11 IST