माहिती नाही : विद्यापीठाकडून संलग्नित महाविद्यालयांच्या यादीचा अभावलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सीईटीचा निकाल जाहीर होताच अभियांत्रिकी पदवी प्रवेशाला ५ जूनपासून प्रारंभ होणे अपेक्षित होते. मात्र, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अभियांत्रिकी प्रवेशाबाबत संलग्निकरण महाविद्यालये निश्चित न केल्यामुळे अद्यापही संकेतस्थळावर प्रवेशाबाबतची माहिती प्रसिद्धी करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशाबाबत गोंधळ कायम आहे. अमरावती विद्यापीठाशी संलग्नित पाचही जिल्ह्यांमध्ये २८ महाविद्यालये असून ११ हजार ४३० जागा प्रवेशासाठी आहेत. परंतु महाविद्यालयांनी काही विषय बंद केले आहे. त्यामुळे अभियांत्रिकी प्रवेशासाठी कोणते महाविद्यालये संलग्नित आहेत, ही यादी मे महिन्यापूर्वीच उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे विद्यापीठाने पाठविणे अनिवार्य होती. संलग्नित महाविद्यालये, अभियांत्रिकी प्रवेश क्षमता निश्चित नसल्याने कोणत्या आधारे प्रवेशाचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाच्या सामाईक प्रवेशपूर्व परीक्षा सेलमार्फत संकेतस्थळावर जाहीर करावे, ही समस्या निर्माण झाली आहे. यावर्षी प्रवेशाच्या तीन फेऱ्या होतील. शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयातील रिक्त राहणाऱ्या जागांसाठी ज्यादा फेरी घेण्याचेही नियोजन आहे. यात १७ जूनपर्यत विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. १७ जूनअखेर विद्यार्थ्यांना गुणपत्रकांची छाननी अर्ज स्वीकृती केंद्रात जाऊन करावी लागेल. १९ जून रोजी पहिली यादी जाहीर होईल. या यादीवर आक्षेप नोंदविल्यास २० व २१ जून अशी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. २२ जून रोजी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. २३ ते २६ जूनदरम्यान अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. २८ जून रोजी पहिली प्रवेशाची यादी जाहीर केली जाणार आहे. ५ ते ८ जुलै अखेर दुसरी विकल्पफेरी होईल. १० जुलै रोजी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची दुसरी यादी लागणार आहे. तिसऱ्या फेरीसाठी रिक्त असणाऱ्या जागांची माहिती १६ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. तिसऱ्या फेरीसाठी विकल्प फेरीत बदल करण्याची मुदत १९ जुलै अखेर आहे. २१ जुलै रोजी प्रवेशाची तिसरी यादी जाहीर होईल. प्रवेशाबाबत सुक्ष्म कार्यक्रम जाहीर करण्यात आला असला तरी संकेतस्थळावर अभियांत्रिकी प्रवेशाबाबतची माहिती अपडेट नसल्याने विद्यार्थी, पालकांंमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अभियांत्रिकी प्रवेशाचा गोंधळ कायम
By admin | Updated: June 7, 2017 00:14 IST