फेरअतिक्रमण दिसेना : ‘पुढे पाठ, मागे सपाट’ अशी अवस्थाअमरावती : अतिक्रमण निर्मूलन पथकाची पाठ फिरताच होणाऱ्या फेर अतिक्रमणावर कुठलीही कारवाई केली जात नसल्याने अतिक्रमणाची अवस्था पुढे पाठ, मागे सपाट’ अशी झाली आहे. शहरात सर्वदूर झालेले पुन: अतिक्रमण महापालिकेच्या पथकाला दिसत नाही की दिसूनही त्याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष केले जात आहे, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. अतिक्रमण निर्मूलन पथकाची धृृतराष्ट्री भूमिकेवर अमरावतीकर चिड व्यक्त करू लागले आहेत. शहरातील अरुंद रस्ते, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, अवैध पार्किंगमुळे सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चुनाभट्टी भागात अवैध अतिक्रमणाच्या आक्रमणामुळे १३ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयीन युवतीचा बळी घेतला होता. रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अवैध पार्किंग आणि अतिक्रमणाचा तो बळी होता. त्याला वाहतूक विभागाच्या नाकर्तेपणाची जोड होती. तेथूनच अतिक्रमणाचा मुद्दा अधिकाधिक चर्चेत आला. सत्ताधिशांनीही त्याची दखल घेऊन आयुक्तांकडे ती समस्या निकाली काढण्याकरिता पाठपुरावा केला. आयुक्तांनी सकारात्मक विचारशैली अंगीकारत अतिक्रमण निर्मूलनाला प्राधान्य दिले. अनधिकृत बांधकामावरही हातोडा पाडण्यात आला. इतवारा, नागपुरी गेट, चांदणी चौक आणि वलगाव रोडवरील अतिक्रमणावर गजराज फिरविण्यात आला. आयुक्तांनी ते आव्हान लिलया पेलले. शाम चौक, बसस्थानक, तखतमल, जयस्तंभ, अंबादेवी रोड, चुनाभट्टी यासह विविध ठिकाणचे अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आले. मात्र तीन दिवसांनंतर परिस्थिती ‘जैसे थे’ झाली. वारंवार तंबी देऊनही पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण थाटले गेले आहे. त्याला संबंधित विभागातील हफ्तेखोरी कारणीभूत असल्याची ओरड आता सार्वत्रिक होऊ लागली आहे. विभागातील काहींच्या आशीर्वादाने अतिक्रमण पुन्हा थाटण्यात येत आहे, असा आरोप सर्वस्तरातून होऊ लागला आहे. (प्रतिनिधी)‘त्या’ अनधिकृत फूडझोनला अभयजिल्हा परिषदेच्या विश्रामगृहालगतच्या भिंतीलगत थाटलेल्या अनधिकृत फूडझोनला अतिक्रमण निर्मूलन विभागाची खास मेहेरनजर आहे. येथील अतिक्रमण आणि त्यामुळे लागणाऱ्या अवैध पार्किंगने एखादा बळी घ्यावा, त्यानंतरच येथील अतिक्रमण उद्ध्वस्त केले जाईल का, असा संतप्त सवाल जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
अतिक्रमण निर्मूलन पथक धृतराष्ट्र !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2016 00:18 IST